प्रतिनिधी/ सातारा
गावागावामध्ये जलजीवन योजना प्रभावीपणे राबवणाऱया सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारत आणि पाठीमागच्या इमारतीत पाण्याचा ठणठणाट बुधवारी जाणवत होता. पाणी नसल्याने चक्क काही कर्मचाऱयांनी घरातूनच पाण्याच्या बाटल्या आणल्या होत्या तर काहींनी बाहेरुन बिसलरीच्या बाटल्या मागवल्या होत्या. दुसऱया बाजूला जिल्हा परिषदेच्या तिसऱया मजल्यावर बांधकाम विभागात एका अभियंत्यांचा वाढदिवस करण्यात दंग होता. सातारा जिल्हा परिषदेच्या इमारतींना पाणी पुरवठा हा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांच्या निवासस्थानी असलेल्या विहिरीतून करण्यात येतो. दर मंगळवारी विद्युत पुरवठा खंडीत होतो. त्यामुळे पाणी पुरवठा उपसा होत नाही अन् त्यांचा परिणाम दर बुधवारी जिल्हा परिषदेच्या काही विभागात पाण्याची टंचाई ही नित्याचीच बाब बनली आहे.








