सुधाकर काशीद/कोल्हापूर
महापालिका इमारतीची माळकर तिकटीच्या बाजूची कमान कायम सजलेली असते. तोरण, मुंडावळ्या, खेळणा, पाळणा, चवरी, अबदागिरी या पारंपरिक धार्मिक सजावटीच्या साधनासह हळद-कुंकू, निरांजनाच्या वाती, धूप, कापूर आणि सुगंधी अत्तर यामुळे ही कमान सतत मंद सुगंधाने दरवळत असते. त्याचप्रमाणे बसून विकले जाणारे हे सारे साहित्य हिंदू धर्मियांच्या विविध सणांचे. आणि हे साहित्य विकणारे सारे मुस्लिम. पण हिंदू-मुस्लीम असल्या भिन्न विचारांची छटा या कमानीवर कधीच नाही. कारण ही कमान म्हणजे कोल्हापूरच्या पिढ्यान पिढ्या जपलेल्या सामाजिक ऐक्याची एक साक्ष म्हणूनच उभी आहे.
आत्ता महापालिकेची इमारत आहे, ती इमारत अर्धी प्रशासकीय कार्यालयासाठी व अर्धी महात्मा गांधी मार्केटचा भाग आहे. त्यामुळे महापालिका इमारतीच्या खाली नारळ, धान्य, कापड, किराणा याची दुकाने आहेत. त्याच्यामध्ये एक मोठी कमान आहे व या कमानीत हळद ,कुंकू, गुलाल धूप, अगरबत्ती विक्रीची पिढ्यान पिढ्या व्यवसाय करणारी छोटी छोटी दुकाने आहेत.
व्यवसाय किंवा उदरनिर्वाहाचे साधन म्हणून जरूर ही दुकाने आहेत. पण ही दुकाने म्हणजे समाजजीवनातील सामाजिक धाग्यांचे प्रतीक आहेत. मोठे उद्योग, मोठे व्यवसाय जेव्हा नव्हते किंवा रोजगाराच्या वेगवेगळ्या संधी नव्हत्या. त्यावेळी प्रत्येकजण एकमेकावर अवलंबून राहून आपला उदरनिर्वाह कसा करत होता याची साक्ष म्हणजे ही दुकाने आहेत. हा व्यवसाय करणारी सारी मंडळी मुस्लिम आहेत. पण, त्यांना हिंदू धर्मातील विविध पूजा विधी, पूजा साहित्य प्रथा-परंपरा यात्रा-जत्रा, अमावस्या, पौर्णिमा याची माहिती तोंडपाठ आहे. कोणत्या विधीला काय साहित्य लागणार याचे पॅकेज त्यांनी तयार ठेवलेले आहे. माणसाच्या आयुष्यातील पहिला विधी म्हणजे त्याच्या जन्मानंतर पाचव्या दिवशी पाचवी पूजनाच्या सोहळ्याचे साहित्य याच ठिकाणी मिळते. व या कमानीचे नाते प्रत्येक माणसाशी जाते.
त्या कमानीत हळद, कुंकू, गुलाल, अष्टगंध याची रास लागते. त्यामुळे ही कमान कायम खुलून उठते. आता तर नवरात्र सोहळा म्हणजे विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल. त्यामुळे ही कमान धार्मिक साहित्याने खचाखच भरली आहे. नवरात्रात गावागावातील मंदिरात बांधण्यासाठी खेळणा, पाळणा, चवऱया, तोरण, अब्दागिरी तयार आहेत. या साऱया वस्तू म्हणजे नवरात्र सोहळ्यासाठी हस्तकौशल्याचे पारंपरिक नमुनेच आहेत.
अलीकडच्या काळात या ना त्या निमित्ताने हिंदू-मुस्लिम यांच्यातील अंतर कसे वाढेल याचेच प्रयत्न काही राजकीय पक्ष व्यक्ती संघटना यांच्याकडून चालू आहेत. त्याचे कमी-अधिक पडसादही अधून मधून उमटत आहेत. पण कोल्हापूरच्या कमानीला सर्वधर्मसमभावाच्या भक्कम बांधणीचा पाया आहे. त्यामुळे नवरात्राच्या पार्श्वभूमीवर तर ही कमान अधिकच सजली आहे. आणि सजावट म्हणजे कोल्हापूरच्या सर्व धर्म समभाव परंपरेवर लखलखणारे तोरणच आहे.
हिंदूंच्या पूजा साहित्याची विक्री करणारी आमची पाचवी पिढी आहे. त्या निमित्ताने हिंदू बांधवांचे आमचे निकटचे नाते आहे. त्यांचे सण अधिक आनंददायी करण्यात आमचा वाटा असल्याचा आम्हाला खूप अभिमान आहे. आता नवरात्राचे निमित्ताने तर, आमची अत्तार कमान खूप सजली आहे. – समीर आत्तार