रेजिनाल्ड ‘फायर ब्रॅन्ड लिडर’ असल्याची ग्वाही
प्रतिनिधी /मडगाव
कुडतरी मतदारसंघाचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स हे काँग्रेस पक्षातून बाहेर पडणार असल्याची चर्चा गेले काही दिवस गोव्यात रंगली होती. आलेक्स यांची देहबोलीसुद्धा तशीच होती. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात खळबळ माजणे स्वाभाविक होते. मात्र, त्याची दखल काँग्रेस पक्षाच्या केंद्रीय नेत्यांनी घेतली. काल मंगळवारी त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर व विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या तसेच आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांच्याकडे दिलजमाई केली.
गेल्या जवळपास दीड-दोन वर्षापासून आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स हे काँग्रेस पक्षापासून दूर राहिले होते. विधानसभेत जरी ते पक्षाच्या बाजूने राहिले तरी विधानसभेच्या बाहेर त्यांनी पक्षापासून बरेच अंतर ठेवले होते. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर व आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांच्या दरम्यान तर कधीच संवाद होत नव्हता. हल्लीच नावेलीचे आमदार लुईझिन फालेरो यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने पक्षाला हादरा बसला होता. त्यात आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स देखील पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याच्या बातम्या पुढे येऊ लागल्याने काँग्रेस पक्षात खळबळ माजली होती.
ऐन निवडणुकीच्या तोंडावर आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स पक्षातून बाहेर पडणे काँग्रेसला अडचणीत आणणारेच ठरले असते. त्यामुळे काँग्रेसचे केंद्रीय नेते राहूल गांधी, श्रीमती सोनिया गांधी, गोवा प्रभारी दिनेश गुंडूराव, पी. चिदंबरम तसेच स्थानिक नेत्यांनी त्यांच्याशी बोलणी करून त्यांची समजूत घालतानाच, त्यांच्या मागण्या ऐकून घेतल्या.
आलेक्स रेजिनाल्ड फायरब्रॅन्ड लिडर
काल मंगळवारी आलेक्सचा वाढदिवस असल्याची संधी साधून प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर व विरोधी पक्षनेते दिगंबर कामत त्यांच्या घरी पोचले व त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी तिघांनी पत्रकार परिषद घेऊन एकसंघपणे 2022च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला लढा देणार असल्याचे स्पष्ट केले.
यावेळी बोलताना गिरीश चोडणकर म्हणाले की, आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स हे काँग्रेस पक्षाचे तरूण व तडफदार आमदार आहेत. त्यांनी विधानसभेत तसेच विधानसभेच्या बाहेर जनतेच्या प्रश्नावर आवाज उठविला. ते पक्षाचे फायरब्रॅन्ड लिडर असून त्यांच्या कार्याबद्दल कुणाच्या मनात कोणतीच शंका नाही. गोव्यातील जनता भाजप सरकारला कंटाळली आहे. या सरकारला घरी पाठविण्यासाठी काँग्रेस पक्ष एकसंघ राहून लढा देणार आहे. या लढय़ात आलेक्स रेजिनाल्ड हे महत्वाची भूमिका बजावतील.
आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स संदर्भात गेले काही दिवस उलट सुलट बातम्या येत होत्या. त्याची दखल केंद्रीय नेत्यांनी घेतली व त्यांच्याशी संवाद साधला. त्यांनी गोव्याच्याच हिताचेच मुद्दे केंद्रीय नेत्यांकडे मांडले आहेत व पक्षाने त्यांचे मुद्दे मान्य करून घेतले आहे. ज्या काही समस्या असतील, त्या सोडविल्या जातील असे चोडणकर म्हणाले.
आलेक्स बजावणार महत्वाची भूमिका
आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी नेहमीच जनतेच्या समस्यांवर आवाज उठविला आहे. आत्ता काँग्रेस पक्षासाठी ते महत्वाची भूमिका बजावणार असून ही केवळ विधानसभा निवडणुकी पुरतीच नाही तर त्यानंतर देखील ते महत्वाची भूमिका बजावतील असे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यावेळी म्हणाले. यावेळी कामत यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
होय, मी इतर पक्षाच्या संपर्कात होतो!
होय मी इतर पक्षाच्या संपर्कात होतो, अशी कबुली यावेळी आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी दिली. काँग्रेस पक्षाच्या कामगिरीवर आपण समाधानी नव्हतो. पक्षाने ज्या पद्धतीने काम करायला पाहिजे होते तसे काम या ठिकाणी होत नव्हते. आत्ता आपली पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे बोलणी झालेली आहे. त्यांनी आपले म्हणणे ऐकून घेतले आहे. 2022 मध्ये होणाऱया विधानसभा निवडणुकीत आम्ही भाजपच्या विरोधात एकत्रितपणे लढा देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राहूल गांधीचे आभार
दरम्यान, राहूल गांधी यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांना खास शुभेच्छा दिल्या. आपल्या शुभेच्छा आपल्यासाठी खुपच महत्वाच्या आहेत. आम्ही गोव्यातील जनतेसाठी अधिक कठोर मेहनत घेऊ असे आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी ट्विटरवर नमूद करून त्यांचे आभार मानले आहेत.









