ऑनलाईन टीम / लखनऊ :
उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी भागात रविवारी कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडणारा केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य रविवारी एका कुश्तीच्या कार्यक्रमासाठी लखीमपूरच्या दौऱ्यावर होते. त्यांच्या स्वागतासाठी केंद्रीय गृहराज्यमंत्री मिश्रा यांच्या मुलासह अन्य कार्यकर्ते तीन गाडय़ांमधून आले होते. ते ज्या मार्गावर होते, त्याच मार्गावर कृषी कायद्यांच्याविरोधात काही शेतकरी आंदोलन करत होते. त्यामुळे आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांसोबत त्यांची बाचाबाची झाली. त्यानंतर आशिष मिश्राने आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घातली. दरम्यान, त्याच्या गाडीखाली चिरडून 9 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे शेतकरी आक्रमक झाले होते. शेतकऱ्यांनी आशिष मिश्रावर कारवाई करण्यासाठी आंदोलन तीव्र करताच पोलिसांनी आशिष मिश्राविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.









