प्रवाशांची गैरसोय : बसथांब्यात अस्वच्छता, स्मार्ट बसथांब्यांचा गैरवापर, महानगरपालिकेने लक्ष देण्याची गरज

प्रतिनिधी /बेळगाव
एकीकडे स्मार्ट सिटीअंतर्गत बसथांब्यांचा विकास साधण्यात येत आहे. तर दुसरीकडे स्मार्ट बसथांब्यांचा गैरवापर होताना दिसत आहे. शहरातील बसथाब्यांवर अनेक निराधार आश्रय घेत असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होताना दिसत आहे. मनपा प्रशासनाने याची दखल घेऊन बसथांबे प्रवाशांना खुले करून द्यावेत, अशी मागणी होत आहे.
शहरातील बसथांब्यावर भटकी कुत्री, जनावरे, मद्यपी त्याबरोबरच आता निराधार क्यक्तींचा वावर वाढल्याने बसथांब्यात अस्वच्छता पसरत आहे. शिवाय स्मार्ट बसथांब्याचे सौंदर्य देखील धोक्मयात येत आहे. धर्मवीर संभाजी चौक येथील वनिता विद्यालय शाळेच्यासमोर असलेल्या बसथांब्यात निराधार क्यक्ती निवांत विश्रांती घेत असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. दरम्यान, प्रवाशांना बसथांबा सोडून रस्त्यावर थांबावे लागत आहे. त्यामुळे वाहतुकीलादेखील अडथळा निर्माण होत आहे.
सोयीपेक्षा गैरसोयीच अधिक
बसथांब्यावर कुत्री, जनावरे व निराधार व्यक्तीची वर्दळ वाढल्याने येथे सोयीपेक्षा प्रवाशांना गैरसोयींना अधिक समोरे जावे लागत आहे. महानगरपालिका, पोलीस प्रशासनाने याकडे लक्ष देऊन त्यांना शिस्त लावावी, अशी मागणी प्रवाशांतून होत आहे.
दरम्यान बसथांब्यात अशा व्यक्तीचा वावर वाढल्याने अस्वच्छता निर्माण होऊन दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे प्रवाशांना नाक धरून थांबावे लागत आहे.
बसथांब्याची दुरुस्ती करावी
बसथांब्यात आश्रय घेत असल्याने मद्यपी आणि निराधार व्यक्तीमुळे प्रवास करणाऱया महिला प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरत आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने त्यांना समज द्यावी, अशी मागणी होत आहे. शिवाय वनिता विद्यालय शाळेजवळील बसथांब्यांची दुर्दशा झाली असून या बसथांब्यात थांबणे प्रवाशांना धोकादायक बनले आहे. त्यामुळे बसथांब्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी देखील होत आहे.









