केर येथील फरा प्रतिष्ठानचे आयोजन
दोडामार्ग / वार्ताहर:
केर येथील फरा प्रतिष्ठान आयोजित अभंग गायन स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. या स्पर्धेत प्रथम क्रमांक सावंतवाडी तालुक्यातील कुणकेरी येथील समृद्धी सावंत हिने पटकाविला तर द्वितीय क्रमांक दोडामार्ग तालुक्यातील कोलझर येथील दिलीप देसाई तर तृतीय क्रमांक कुडाळ तालुक्यातील नितीन धामापूरकर यांनी मिळविला आहे.
ही स्पर्धा फरा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रेमानंद देसाई यांनी आयोजित केली होती. श्री. देसाई हे प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम, दशावतार नाटक तसेच विविध स्पर्धांचे आयोजन करत असतात. ही अभंग गायन स्पर्धा गेल्या महिन्यातच आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत यशस्वी झालेल्या स्पर्धकांना येत्या 14 ऑक्टोबर रोजी केर येथे फरा प्रतिष्ठानच्यावतीने एका खास कार्यक्रमात सन्मानपत्र, सन्मानचिन्ह व रोख रक्कम देऊन गौरविण्यात येणार आहे. यामध्ये उत्तेजनार्थ ज्ञानेश्वर गावस, गीतेश मणेरकर, गणेश शिरोडकर, सचिन देसाई, मैथिली सावंत यांनी मिळविला आहे. या स्पर्धेचे परीक्षण प्रसाद गोसावी, पांडुरंग परब, अमित परब आदींनी केले. या स्पर्धेचे निकाल जेष्ठ संगीत अभ्यासक गंगाराम गोसावी यांनी जाहीर केले आहेत.









