प्रतिनिधी/ बेळगाव
महात्मा गांधीजींनी आपल्या कारकिर्दीत अहिंसेच्या मार्गाने सत्याग्रह-उपोषणे केली. त्यांच्याच जयंतीदिवशी बॅरिकेड्स हटविण्यासाठी बेळगावमध्ये गांधीगिरी करत आंदोलन करण्यात आले. पहिले रेल्वेगेट येथे घालण्यात आलेले बॅरिकेड्स हटविण्याची मागणी आंदोलकांनी केली. आता प्रशासन या गांधीगिरीची दखल घेऊन बॅरिकेड्स हटविणार का? हे पहावे लागणार आहे.
काँग्रेस विहिरीजवळील वीरसौध येथे शनिवारी सकाळी 7 वाजता सत्याग्रह करण्यात आला. परिसरातील रहिवासी, व्यापारी, वाहनचालक, विद्यार्थी, गवळी समाज व रिक्षाचालकांच्यावतीने सत्याग्रह करण्यात आला. गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंतीचे औचित्य साधून सत्याग्रह करण्यात आला. परंतु या ठिकाणी विविध कार्यक्रम असल्यामुळे काही काळातच पोलीस दाखल होऊन येथे आंदोलन करू नये, असे आंदोलकांना सांगितले. पोलिसांच्या सूचनेचा मान राखत आंदोलकांनी पहिल्या रेल्वेगेट येथे जावून काहीकाळ आंदोलन केले.
यावेळी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ, पोलीस आयुक्त त्यागराजन, खासदार मंगला अंगडी यांना बॅरिकेड्स हटविण्यासाठी निवेदन देण्यात आले.
टिळकवाडी येथील पहिले रेल्वेगेट येथे 7 वर्षांपूर्वी बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी बॅरिकेड्स लावण्यात आल्याचे त्यावेळी पोलिसांकडून सांगण्यात आले. परंतु यामुळे देशमुख रोड, काँग्रेस रोडमार्गे टिळकवाडीत ये-जा करणाऱया नागरिकांची गैरसोय होऊ लागली. केवळ नागरिकच नव्हेतर पाळीव जनावरांना या बॅरिकेड्सचा फटका मागील अनेक वर्षांपासून बसत आहे. पलिकडे जाण्यासाठी सर्वांनाच वळसा घालून जावे लागत आहे. त्यामुळे फेरीवाले, रिक्षाचालक, शालेय विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे बॅरिकेड्स हटविण्याची मागणी आंदोलकांनी लावून धरली.
यावेळी सुभाष घोलप, मदन रेवाळे, जयश्री रेवाळे, अमित जोशी, दीपक गुंडोळकर, गुरुराज घुमास्ते, अर्चना मेस्त्री, विजय कामकर, हावळाण्णाचे, प्रकाश यादव-भवानी, तवनोजी, नितीन भट, तानाजी दळवी, वसंत जोशी, वसंत सामंत, पुरोहित, विद्या कदम, रितेश ढवळे, पिराजी गवळी यांच्यासह नागरिक या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते.