वार्ताहर / औंध :
घाटमाथा- पुसेसावळी राज्यमार्गावर त्रिमली ता. खटावनजीक दुचाकी आणि चारचाकी गाडीची समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात 45 वर्षीय दुचाकीस्वार जागीच ठार झाला. दरम्यान अपघातानंतर दुचाकी गाडी जाग्यावरच जळून खाक झाली.
याबाबत घटनास्थळ व औंध पोलीस स्टेशनमधून मिळालेली अधिक माहिती अशी, कैलास बाजीराव गायकवाड (वय 45 वर्षे) हे वर्धन ॲग्रो कारखान्यातील आपली डयुटी संपवून रायगाव ता. कडेगाव या आपल्या गावी निघाले होते. कारखान्यापासून दीड ते दोन किलोमीटर अंतरावर समोरून येणाऱ्या अल्टो 800 गाडीची त्यांना जोरदार धडक बसली. यात कैलास गायकवाड यांची दुचाकी सुमारे शंमर फुट फरफटत गेल्याने त्यांचा उजवा पाय गुडघ्यापासून खाली तुटून पडला होता तसेच मेंदूला ही जखम झाली होती. त्यामुळे त्यांचा जागेवरच मूत्यू झाला तर दुचाकी ही जाग्यावर पेटून जळून खाक झाली. चारचाकी गाडीनेही दोन-तीन पलट्या घेतल्या. दरम्यान घटनास्थळी स्थानिक ग्रामस्थ व पोलीस पोहचण्या अगोदरच चारचाकी गाडीतील ड्रायव्हर व अन्य व्यक्ती तिथून पसार झाले होते. या घटनेची नोंद औंध पोलीस स्टेशनमध्ये झाली असून, अधिक तपास बी.एन.जाधव करीत आहेत.