वाळपई/प्रतिनिधी
अडवई सत्तरी येथील प्रदीप अर्जुन गावकर यांच्या घराला अचानकपणे शॉर्टसर्किट होऊन घरातील सिलिंडरचा स्फोट झाला. घरातील संपूर्ण सामान जळून खाक झाले. या घटनेत जवळपास पाच लाखांच्या आसपास नुकसानी होण्याची शक्मयता वर्तविली जात आहे. घटनेची माहिती वाळपईच्या अग्निशामक दलाला दिल्यानंतर जवानांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेऊन बऱयाच प्रमाणात मालमत्ता वाचविण्यात यश प्राप्त केले.
याबाबत माहिती अशी की, भिरोंडा पंचायत क्षेत्रातील अडवई येथे राहणाऱया प्रदीप अर्जुन गावकर, अर्जुन गावकर व अमित गावकर हे तिघे भाऊ एका घरांमध्ये राहतात. या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट आहे. मिळणाऱया काम धंद्यावर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करून हे कुटुंब कसेबसे आपले जीवन जगतात. शुक्रवारी दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास अचानकपणे शॉर्टसर्किट होऊन त्यांच्या घराला आग लागली. यातच घरातील घरगुती सिलिंडरचा मोठा स्फोट होऊन घरातील संपूर्ण सामानाची नुकसानी झाली आहे. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. घरातील घरगुती सिलिंडरचा स्फोट होऊन घरातील कपडे ,भांडी, कपाट, इलेक्ट्रॉनिक वस्तू आगीत जळून खाक झाल्या आहेत.
दरम्यान पाहणी करून या कुटुंबाशी संवाद साधला असता प्रदीप गावकर यांनी सांगितले की, आज या कुटुंबासमोर महाभयंकर संकट उभे राहिले आहे. सरकारने याबाबत गांभीर्याने लक्ष देऊन आपला संसार पुन्हा एकदा उभा करण्यासाठी मदत करावी, अशी याचना केली आहे.