मध्यप्रदेशातील एका डॉक्टरची वैद्यकीय पदवी सध्या अमरोहा, रामपूर आणि बरेली या उत्तरप्रदेशातील शहरांमध्ये रुग्णालयांमध्ये उपयोगात आणली जात आहे. अविश्वसनीय वाटणारी ही घटना प्रत्यक्षात घडली आहे. या डॉक्टरने आपली पदवी चक्क भाडय़ाने दिली आहे आणि तो आपल्या मूळ राज्यात म्हणजे मध्यप्रदेशमध्ये पळून गेला आहे. आता त्याच्या पदवीवर चालणारी रुग्णालये बंद करण्यात आली आहेत. राज्य सरकारने या डॉक्टरविरोधात कठोर कारवाई सुरू केली आहे.
या डॉक्टरचे नाव धर्मेंद्र असे असून तो मध्यप्रदेशातील खांडवा येथे राहतो. डॉक्टरीच्या एका पदवीवर तीन-चार ठिकाणांहून उत्पन्न कमावण्याची एक अजब शक्कल त्याने लढविली. त्याने आपली पदवी या रुग्णालयातील काही टेक्निशियन्सना वापरावयास दिली आहे. आता हे टेक्निशियन्स त्यांच्याकडे कोणतीही पात्रता नसताना अल्ट्रासाऊंडसारखी निदाने करीत आहेत आणि या डॉक्टरच्या नावाने प्रमाणपत्रे देत आहेत. एका वृत्तसंस्थेने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमधून हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नियमानुसार ज्या डॉक्टरच्या नावाने अल्ट्रासाऊंड क्लिनिक नोंद आहे, तोच डॉक्टर या चाचण्या करू शकतो. पण या प्रकारात एका डॉक्टरच्या नावे अनेक क्लिनिक्समध्ये चाचण्या चालत असल्याचे दिसून आले. आता या सर्व क्लिनिक्सना टाळे ठोकण्यात आले आहेत.









