प्रसारभारतीचा मोठा निर्णय : आजपासून बंद होणार ऍनालॉग फ्रीक्वेंसी : डिशच्या माध्यमातून वाहिनीचे डिजिटल प्रसारण
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
देशात 55 वर्षे जुन्या अँटिनाचा प्रवास आता पूर्णपणे संपुष्टात येणार आहे. अशा स्थितीत आता घरांच्या छतावर अँटिना पहायला मिळणार नाही. प्रसारभारतीने 1 ऑक्टोबरपासून डीडी नॅशनलची ऍनालॅग फ्रीक्वेंसी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. डीडी नॅशनल आता केवळ सॅटेलाइड डिशद्वारेच पाहता येऊ शकेल. यासंबंधी प्रसारभारतीने पत्र जारी केले आहे.
1965 च्या आसपास दिल्लीत प्रसारभारतीकडून दूरदर्शन केंद्राची निर्मिती करण्यात आली होती. तोपर्यंत उपग्रहीय युगाचा उदय झाला नव्हता. लोकांच्या घरांपर्यंत सिग्नल पाठविण्यासाठी ऍनालॉग तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात येत होता. या तंत्रज्ञानात एका सेंटवरून वाहिनीच्या तरंगांना वायुमंडळात प्रसारित केले जायचे. अँटिनांच्या माध्यमातून याचे सिग्नल टेलिव्हिजन बॉक्सपर्यंत पोहोचत होते. दुर्गम भागात हे सिग्नल नीट पोहोचू शकत नसल्याने लोकांना अँटिना वारंवार फिरवायला लागत होता.
2004 पर्यंत अँटिनाचा वापर देशात मोठय़ा प्रमाणात व्हायचा. पण उपग्रहीय युग सुरू झाल्यावर अँटिनाचा वापर हळूहळू कमी होत गेला. आता काही मोजक्या घरांवरच ऍँटिना दिसून येत होता. जो भविष्यात दिसणे देखील बंद होणार आहे.
3 टप्प्यांत होणार अंमलबजावणी
देशभरात दूरदर्शनचे एकूण 412 रिले सेंटर आहेत. या सेंटर्सना प्रसारभारतीने एकूण तीन टप्प्यांमध्ये बंद करण्याची योजना आखली आहे. 31 ऑक्टोबरपर्यंत 152 तर 31 डिसेंबरपर्यंत 109 रिले सेंटर बंद करण्यात येतील. त्यानंतर 31 मार्च 2022 पर्यंत 261 सेंटर्स बंद केले जाणार आहते. देशातील दुर्गम क्षेत्र जम्मू, लडाख, अंदमान भागातील 54 रेल सेंटर्स मात्र कार्यरत राहणार आहेत. प्रसारभारतीनुसार डीटीएच सेवा सुरू झाल्यावर या रिले सेंटरची फारशी गरज राहिली नव्हती. दूरदर्शन वाहिनीचे प्रसारण डिजिटल स्वरुपात डीडी डायरेक्टवर सुरूच राहणार आहे.