प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्याच्या पर्यटन विकासात औद्योगिक क्षेत्रही महत्वपूर्ण भूमिका बजावेल, असा विश्वास जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी गुरुवारी येथे व्यक्त केला.
पालकमंत्री सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून जिल्हा प्रशासनातर्फे दि.26 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर दरम्यान `पर्यटन दिन सप्ताह’ आयोजित करण्यात आला आहे. याअंतर्गत औद्योगिक पर्यटन (इंडस्ट्रीयल टुरिझम) विकासाच्या दृष्टीने कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील किर्लोस्कर ऑइल इंजिन्स येथे गुरुवारी जिल्हाधिकारी रेखावार यांनी भेट दिली. डी. वाय. पाटील इंजिनिअरिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी याठिकाणी क्षेत्रभेट देऊन माहिती घेतली.
यावेळी राधानगरी प्रांताधिकारी सुशांत बनसोडे, तहसीलदार शिल्पा ठोकडे, कागल- हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहत, इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष गोरख माळी, गोशिमाचे अध्यक्ष मोहन पंडितराव, किर्लोस्कर ऑईल इंडस्ट्रीचे उपाध्यक्ष चंद्रहास रानडे, उद्योगपती सचिन मेनन, किर्लोस्कर एच आर विभागाचे महाव्यवस्थापक धीरज जाधव, वरिष्ठ महाव्यवस्थापक (युटिलिटीज) विवेक देशपांडे, एचआर व्यवस्थापक राहूल पवार, क्रेडाईचे आदित्य बेडेकर, पर्यावरण तज्ञ उदय गायकवाड आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी रेखावार म्हणाले, औद्योगिक क्षेत्रात `किर्लोस्कर’ ही प्रख्यात व अग्रगण्य कंपनी आहे. कोल्हापूरमधील औद्योगिक क्षेत्राला जागतिक दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील.
कंपनीतील वेस्ट प्लास्टिक पासून इंधन तयार करण्याच्या प्लांटला भेट देवून हा एक अभिनव आणि यशस्वी प्रयोग असल्याचे जिल्हाधिकार्यांनी सांगितले.