जिल्हाधिकारी जारी केले सुधारित आदेश : मार्गदर्शक तत्वांचे पालन करावे लागणार
प्रतिनिधी /सातारा
कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने राज्य शासनाने नवरात्रोत्सवापासून 7 ऑक्टोबरपासून राज्यातील प्रार्थनास्थळे भाविकांसाठी खुली करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयास अनुसरून जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी प्रार्थनास्थळे खुली करण्यासाठी आज मानक कार्यप्रणाली तथा मार्गदर्शक तत्वे जारी केली असून तसे आदेश दिले आहेत. त्यामुळे मंदिरे 7 ऑक्टोबरपासून खुली होणार आहेत. दरम्यान, बुधवारी रात्रीच्या अहवालात 214 नागरिकांचे अहवाल बाधित आले असून 137 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. एकाही नागरिकाचा मृत्यू झालेला नाही.
कंटेनमेंट झोनबाहेरील प्रार्थनास्थळे खुल
जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सुधारित आदेश जारी करताना ज्या भागात कंटेनमेंट झोन आहे, त्या भागातील प्रार्थनास्थळे बंद राहणार असून त्याच्या बाहेर असणारी प्रार्थनास्थळे खुली होणार असल्याचे म्हटले आहे. प्रार्थनास्थळांच्या वेळेबाबतचा निर्णय विश्वस्त मंडळ, अधिकारी यांनी घ्यावयाचा आहे. भाविकांसाठी कोविड सोशल डिस्टन्स, मास्क, सॅनिटायझरसह अन्य कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. थर्मल स्क्रीनिंगची व्यवस्था, लक्षणे नसलेल्या लोकांनाच प्रार्थनास्थळात प्रवेश असणार आहे. मास्क नसल्यास प्रवेश दिला जाणार नाही.
प्रार्थनास्थळांच्या आवारातील दुकाने, आस्थापनांत सोशल डिस्टन्स हवे
प्रार्थनास्थळांच्या आवारात असणारी दुकाने, स्टॉल यांच्यात सोशल डिस्टन्स आवश्यक आहे. तेथेही गर्दी होऊ देऊ नये. वाहनांच्या पार्किंगच्या ठिकाणीही सोशल डिस्टन्स राखणे गरजेचे आहे. किती भाविकांना प्रवेश द्यावा, याचा निर्णय स्थानिक व्यवस्थापनाने घ्यावा. स्वतंत्र प्रवेश मार्गाची व्यवस्था करावी. प्रभावी स्वच्छता व निर्जंतुकीकरण करावे. सामाजिक अंतर, जागा व भाविकांची संख्या याबाबत पोलीस अधीक्षकांना हमीपत्र देणे आवश्यक आहे. मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी काटेकारे होत आहे का, याची तपासणी करण्याचे अधिकार पोलिसांना देण्यात आले आहेत. याचे उल्लंघन झाल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचे या आदेशात म्हटले आहे.
दोन दिवसांत पॉझिटिव्हीटी वाढली
लाट कमी होत असली तरी सलग चार दिवस दोनशेच्या आत रूग्ण आल्यानंतर बुधवार व गुरूवारी आकडा पुन्हा दोनशेवर गेला आहे. पॉझिटिव्हीटी रेट 2.77, 2.85 टक्के असा किंचित वाढला आहे. लसीकरण वाढल्याने संसर्ग रोखण्यास मदत होत आहे. मात्र तरीही खबरदारी घेणे आवश्यक आहे.
साताऱयात सर्वाधिक 66 रूग्ण
जिह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 214 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे. यात सातारा तालुक्यात प्रथम क्रमांकाचे 66 रूग्ण वाढले आहेत. तर फलटणमध्ये 52 रूग्ण वाढले आहेत. हॉटस्पॉट असणाऱया या तालुक्यांमध्ये संसर्ग कमी झाला असला तरी या दोन तालुक्यांतच सर्वात जास्त वाढ होत आहे.
महाबळेश्वरला एका रूग्णाची नोंद
जिल्हय़ात अन्य तालुक्यांत आकडे दिलासा देणारे असून महाबळेश्वर तालुक्यात केवळ एका रूग्णाची नोंद झाली आहे. तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आजअखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढीलप्रमाणे आहे. जावली 5 (9957), कराड 17 (38856), खंडाळा 8 (14069), खटाव 20 (25476), कोरेगांव 8 (21761), माण 24 (17680), महाबळेश्वर 1 (4668), पाटण 4 (10088), फलटण 52 (36898), सातारा 66 (51153), वाई 3 (15658) व इतर 3 (2098) असे आज अखेर एकूण 248365 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.
137 जणांना डिस्चार्ज
जिह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 137 जणांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. तसेच गेल्या चोवीस तासात एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही.
गुरूवारी जिल्हय़ात
- एकूण बाधित 214
- एकूण मुक्त 137
- एकूण बळी 00
गुरूवारपर्यंत जिल्हय़ात
- एकूण नमूने 2078545
- एकूण बाधित 248365
- घरी सोडलेले 239304
- मृत्यू 6084
- उपचारार्थ रूग्णा 5423