प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वारसा स्थळे आणि सर्व पर्यटन स्थळांच्या ठिकाणी स्वच्छता मोहिम उद्या, शनिवारी गांधी जयंती निमित्त राबविण्यात येणार आहे. यामध्ये नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी गुरुवारी केले.
जिह्यांमध्ये विपुल प्रमाणात वारसास्थळे तसेच पर्यटनस्थळ लाभलेली आहे. या सर्व वारसा स्थळांची आणि पर्यटन स्थळांचे संवर्धन करणं हे एक सुजाण नागरिक म्हणून आपले आद्यकर्तव्य आहे. उद्या, शनिवारी राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळ व वारसा स्थळे या ठिकाणी व्यापक प्रमाणामध्ये स्वच्छता मोहीम राबविली जाणार आहे. सर्व नागरिकांना त्या-त्या ठिकाणचे मुख्याधिकारी, गावातील ग्रामसेवक, तालुक्याचे तहसीलदार, गटविकास अधिकारी, या सर्वांसोबत समन्वय साधून अत्यंत चांगल्या पद्धतीने ही मोहीम आपल्याला राबवायची आहे. या मोहिमेमध्ये जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी, स्वयंसेवी संस्थांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे आणि ही मोहीम यशस्वी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी रेखावार यांनी केले आहे.