चालकाने रिक्षात लावली रोपे
काही लोकांनी हवामान बदल रोखण्यासाठी केलेले छोटेसे काम देखील अनेकांसाठी उदाहरण प्रस्थापित करणारे ठरते. तिरुपतिमधील कोमपाला बाबू यांना निसर्गाबद्दल असलेले प्रेम त्यांच्या कृतीतून दिसून येते. कोमपाला बाबू यांनी स्वतःच्या रिक्षामध्ये अनेक रोपे ठेवली आहेत.
कोमपाला बाबू यांचे वय 58 वर्षे असून ते केसीनेनी गुंटा येथील रहिवासी आहेत. त्यांनी स्वतःच्या ऑटोरिक्षामध्ये अनेक रोपे ठेवली आहेत. लोकांना पर्यावरणाबद्दल जागरुक करणे आणि हिरव्या आच्छादनाला बळ देण्यासाठी त्यांनी स्वतःच्या चालत्या-फिरत्या रिक्षामध्येच रोपे लावली आहेत.
कोमपाला पूर्वी दूग्धोत्पादनाचे वितरक होते. पण 2011 मध्ये त्यांना ब्रेन टय़ूमर झाला आणि त्याच्या उपचाराकरता 11 लाख रुपये खर्च झाले, घर देखील विकावे लागले. स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांनी 2019 मध्ये ऑटो रिक्षा चालविण्यास सुरुवात केली होती.
रिक्षातील रोपे पाहून लोकांना त्यातून प्रवास करणे आवडते. एखाद्या पार्कमध्ये बसल्यासारखे प्रवाशांना वाटते. या रिक्षात बसल्यावर लोकांना पर्यावरण रक्षणाची चिंता देखील सतावू लागते. लोकांचे आरोग्य बिघडविणाऱया आजारांपासून निसर्गच आम्हाला वाचवू शकतो यावर माझा विश्वास असल्याचे कोमपाला बाबू यांनी म्हटले आहे.