जिल्हा परिषदेतील चित्र, बांधकाममधील कर्मचाऱयाकडून प्रशासकीय नियम धाब्यावर, अर्थपूर्ण कारभारामुळे ‘बांधकाम’च्या खुर्चीवर तळ
कृष्णात चौगले/कोल्हापूर
ऑगस्ट अखेरीस बांधकाम विभागातून ‘आरोग्य’ विभागात स्थानांतरण होऊन देखील बांधकाममधील एक कर्मचारी तेथील ‘विशेष’ खुर्चीला चिकटून बसला आहे. ‘आरोग्य’ विभागात हजेरी नोंदवून काम मात्र बांधकामच्या ‘अर्थपूर्ण’ टेबलवर करत आहे. त्याला ‘बांधकाम’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडूनच अभय मिळत असल्यामुळे त्याच्या विरोधात बोलणार कोण ? आणि तक्रार कोठे करायची ? असा प्रश्न बांधकाममधील कर्मचाऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. तसेच संबंधित कर्मचाऱयाच्या स्थानांतरणानंतर तेथील रिक्त जागेवर नियुक्ती झालेल्या कर्मचाऱयांचीही कुचंबना होत आहे.
मुख्यालयातील एकाच विभागात पाच वर्षांहून अधिक काळ कार्यरत असलेल्या 81 कर्मचाऱ्यांचे सीईओ संजयसिंह चव्हाण यांनी स्थानांतरण (एका विभागातून दुसऱया विभागात बदली) केले. सात वर्षानंतर ऑगस्टमधील या स्थानांतरण बदल्यांमुळे एकाच विभागात तळ ठोकलेल्यांची बदली झाली असून कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या विभागात कामाची संधी मिळाली आहे.
बांधकाम’च्या पाहुण्यांना विशेष ‘ट्रिटमेंट’
2013 नंतर रेंगाळलेली स्थानांतरण प्रक्रिया सीईओ चव्हाण यांनी पारदर्शीपणे राबवली. त्यामुळे निरपेक्षपणे काम करणाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. पण हातातून लाभाचे टेबल निसटलेल्या काहींनी नाराजी व्यक्त केली. स्थानांतरणाला महिना लोटला असून बहुतांशी कर्मचारी नव्या ठिकाणी हजर झाले आहेत. त्यांनी काम देखील सुरु केले आहे. पण बांधकाम विभागातील वरीष्ठ अधिकाऱ्याचा जवळचा पाहुणा असलेल्या एकाचे (कनिष्ठ सहाय्यक) ‘आरोग्य’मध्ये स्थानांतरण झाल्यानंतरही तो ‘बांधकाम’मध्ये कार्यरत आहे. हा कर्मचारी आरोग्य विभागात हजर झाला, पण त्याने पदभार स्विकारलेला नाही. सध्या तो मूळ ठिकाणीच कार्यरत आहे.
‘वर्क ऑर्डर’मध्ये इंटरेस्ट
बांधकाम विभाग विकास कामांच्यादृष्टेने अतिशय महत्वाचा आहे. येथे प्रत्येक कामाच्या मंजुरीनंतर निविदा जाहीर करून त्यानंतर वर्कऑर्डर निघते. ही वर्कऑर्डर काढण्यासाठी विकास कामांना मंजूर झालेल्या निधीतील 2 टक्के रक्कम विभाग प्रमुखांना द्यावी लागत असल्याची ठेकेदारांचा आरोप आहे. वर्कऑर्डरचे हे टेबल ‘वजनदार’ असल्यामुळेच आरोग्य विभागात स्थानांतरण होऊनदेखील हा कर्मचारी ‘बांधकाम’मध्येच कार्यरत आहे. विभागाचे ‘गणित’ करणाऱया सहाय्यक अधिकाऱ्याची त्याच्यासोबत मिलिभगत असून ‘मिल बाटके खाएंगे’ असे त्यांचे सुत्र आहे.
पदभार देण्यासाठी चालढकल
‘बांधकाम’मधील कनिष्ठ सहाय्यकाचे आरोग्य विभागात स्थानांतरण झाल्यानंतर तेथे दुसरा कर्मचारी रुजू झाला आहे. पण या कर्मचाऱ्याकडे त्याने ‘बांधकाम’चा पदभार दिला नसल्याने त्याची कोंडी झाली आहे. या सर्व घडामोडीत मात्र आरोग्य विभागातील अनेक कामे प्रलंबित राहिली आहेत.
कर्मचाऱ्यांची मनमानी, सीईओ अनभिज्ञ
स्थानांतरण होऊनदेखील तेथे हजर न होणे, काम न करणे, प्रतिनियुक्ती रद्द झाल्यानंतरही मूळ ठिकाणच्या कामाचा स्विकार न करणे, कार्यालयात कमी आणि बाहेर जास्त, असा मनमानी कारभार करणाऱ्यांना चाप कधी बसणार, अशी विचारणा होत आहे.
विकासकामांच्या शेकडो फायली प्रलंबित
बांधकाम विभागांतर्गत येणाऱया विकास कामांच्या शेकडो फायली प्रलंबित असल्याच्या ठेकेदारांच्या तक्रारी आहेत. वर्कऑर्डरसाठी रोज या विभागाचे उंबरठे झिजवून देखील त्यांना मंजुरी दिली जात नसल्याचे चित्र आहे. ज्यांच्याकडून ‘अर्थपूर्ण’ कारभार केला जातो, त्यांच्याच फायली मंजूर करण्याचा पायंडा पडल्याचा ठेकेदारांचा सूर आहे.
‘









