बांधकाम परवाने देण्याचा अधिकार रद्द : कचरा विल्हेवाट व्यवस्था न केल्याचा परिणाम,कचरा केंद्र स्थापण्यास आठ आठवडय़ांची मुदत
प्रतिनिधी /पणजी
जोपर्यंत कचरा विल्हेवाट प्रकल्प आणि सुका कचरा गोळा करून ठेवण्याची सुविधा पंचायत उपलब्ध करून देत नाही, तोपर्यंत उत्तर गोव्यातील 12 पंचायतींना कोणतेच बांधकाम परवाने देता येणार नाही, असे गोव्यातील मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट करून सांताक्रूझ, आजोशी-मंडूर, सां मातियश, हरमल, नेरूल, गिरी, सांगोल्डा, मयडे, हळदोणे, साल्वादोर दी मुंद, नादोडा आणि आमोणे या 12 पंचायतीचे परवाने देण्याचा अधिकार काढून घेण्यात आला आहे.
एमआरएफ हा सुका कचरा साठवण्याचे केंद्र स्थापन करण्यास या 12 पंचायतींना आठ आठवडय़ाची मुदत दिली आहे. या आदेशाची अंमलबजावणी केली जाईल याची खबरदारी घेण्याचा आदेश पंचायत संचालकांना दिला आहे. एम.आर.एफ. सुविधा उपलब्ध न केल्यास कठोर कारवाई करण्याचा आदेश न्यायपीठाने संचालकांना दिला आहे.
साळगाव पंचायतीची याचना
एकूण 13 पंचायतींनी एमआरएफ म्हणजे मटेरियल रिकव्हरी फेसेलिटी ही सुविधा अजून तयार पेलेली नाही. पैकी साळगाव पंचायतीने स्पष्टीकरण देताना कचरा विल्हेवाट प्रकल्पच साळगाव पंचायत क्षेत्रात आहे. त्यामुळे एमआरएफ सुविधा स्थापनेपासून सुटका द्यावी, अशी याचना साळगाव पंचायतीने केली आहे. उर्वरित 12 पंचायतींना दोन महिन्यांची मुदत दिली. पैकी सांताक्रूझ पंचायतीच्या वकिलांनी उच्च न्यायालयाला आश्वासन देताना या पंचायतीत एमआरएफ सुविधा उपलब्ध करण्यास चार आठवडे पुरे असून चार आठवडय़ांच्या आत सदर व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले.
आश्वासनपूर्तीच्या अहवालाचा आदेश
उच्च न्यायालय दोन महिन्यांची मुदत देत असताना फक्त एक महिना पुरे असे सांगणाऱया सांताक्रूझ पंचायतीच्या म्हणण्याची खास नोंद न्यायपीठाने घेतली. सदर म्हणणे न्यायालयाला दिलेली हमी म्हणून गृहित धरली जाईल व ती पूर्ण न केल्यास सरपंच आणि पंचायतीतील सचिवांवर कारवाई केली जाईल, असे यावेळी न्यायपीठाने स्पष्ट केले. आश्वासनपूर्ती अहवाल 22 नोव्हेंबर 2021 पर्यंत सादर करण्याचा आदेश दिला.
… तर पंचायतींवर होणार कारवाई
एमआरएफ सुविधा सुरू करण्यापूर्वी जर एखाद्या पंचायतीने बांधकाम परवाना कोणालाही दिला तर त्या पंचायत मंडळावर व कर्मचाऱयांवर कारवाई करण्याची जबाबदारी पंचायत संचालकांची राहिल, असेही न्यायपीठाने स्पष्ट केले आहे.
दणका पडलेल्या पंचायती
- सांताक्रूझ
- आजोशी-मंडूर
- सां मातियश
- हरमल
- नेरूल
- गिरी
- सांगोल्डा
- मयडे
- हळदोणे
- साल्वादोर दी मुंद
- नादोडा आमोणे