प्रतिनिधी / कोल्हापूर
जिह्यातील पर्यटन विकासासाठी लोकसहभाग महत्वाचा आहे. हा विकास शाश्वत आणि सर्वसमावेशक कसा करता येईल या दृष्टीने प्रयत्न केले जातील, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी मंगळवारी येथे केले.
जागतिक पर्यटन दिनानिमित्त `सायबर’ महाविद्यालय येथे पर्यटन विभाग , जिल्हा प्रशासन, सायबर महाविद्यालय व कारवा हॉलिडेज यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यटन सप्ताहाच्या माध्यमातून ‘पर्यटन विकास व जागरूकता ‘या विषयावर आयोजित वेबिनार मध्ये ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ.पी .एस. पाटील होते. प्रमुख उपस्थिती `सायबर’ महाविद्यालयाचे संचालक डॉ. सी .एस. दळवी, `कारवा हॉलिडेज’ चे संस्थापक संचालक वसीम सरकवास यांच्यासह ऑनलाईनद्वारे पर्यटन विभागाच्या उपसंचालिका सुप्रिया करमळकर, पर्यटन तज्ञ राकेश माथूर, चंद्रशेखर भडसावळे आदींची होती.
जिल्हाधिकारी रेखावार म्हणाले, जिह्यातील पर्यटन व्यवसाय वाढीसाठी संस्था, व्यक्ती, समूह एकत्र येऊन पर्यटनाला नवी चालना देण्याची गरज आहे. डॉ. पी. एस. पाटील म्हणाले, पर्यटन सप्ताहाच्या माध्यमातून जिह्यातील अनेक दुर्लक्षित पर्यटनस्थळे विकसित करण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे. डॉ. सी. एस. दळवी म्हणाले, पर्यटन स्थळे, यंत्रणा व पर्यटन मार्केटिंग व सेवा या विषयावर विशेष लक्ष देण्याची गरज आहे.
राकेश माथुर म्हणाले, क्रीडा पर्यटन, स्पोर्ट्स व हेरिटेज पर्यटन त्याचबरोबर अध्यात्मिक पर्यटन क्षेत्रामध्ये मोठी संधी निर्माण झाली आहे. चंद्रशेखर भडसावळे म्हणाले, व्हिएतनाम, सिंगापूर या देशाची ची प्रगती पर्यटन क्षेत्रामुळे झाली आहे. त्यामुळे पर्यटन संस्कृती स्वतःपासून विकसित करणे ही काळाची गरज आहे. सुप्रिया करमळकर म्हणाल्या, समाज ,संस्कृती, पर्यावरण व अर्थव्यवस्था यावर पर्यटनाचा विकास अवलंबून आहे. वीणा ट्रव्हल्सचे संस्थापक संचालक सुधीर पाटील म्हणाले, टूर ऑपरेटर्स व एजंट हे खरे पर्यटन विकास मध्ये ब्रँड अँबेसिडर होण्याची गरज आहे. वसीम सरकवास यांनी आभार मानले.