आदर्श शहर बनवा, हद्दवाढीला विरोध मावळेल
प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर शहराची हद्दवाढीसाठी राज्यशासनाकडे 20 गावांचा प्रस्ताव पाठविला आहे. यामध्ये काही त्रुटी असून नव्याने दुसरा प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना आमदार चंद्रकांत जाधव यांनी महापालिकेच्या प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांना केल्या. विकासाला वाव असणाऱ्या गावांचा यामध्ये समावेश करावा, असेही त्यांनी सांगितले.
ताराबाई पार्क येथील महापालिकेच्या निवडणूक कार्यालयात मंगळवारी आमदार चंद्रकांत जाधव यांनी शहरातील विविध विषयासंदर्भात आढावा बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते. विशेषतः हद्दवाढीसाठी पोषक वातावरण कसे निर्माण करता येईल. या दृष्टीकोनातून त्यांनी अधिकाऱयांशी सविस्तर चर्चाही केली. प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांची प्रमुख उपस्थिती होत्या. शहरामध्ये स्वच्छता, आरोग्य, कचरा उठाव, पाणीपुरवठा अशा नागरी सुविधा दर्जदार पद्धतीने देण्यासाठी प्रयत्नशील असले पाहिजे. शहर चांगले झाले तर हद्दवाढीचा विरोध मावळेल. स्वतःहून गावे शहरात येण्यासाठी पुढे येतील. महापालिकेच्या कर्मचाऱयांनी या पद्धतीने नियोजन केले पाहिजे.
आदर्श शहर बनवा, हद्दवाढीला त्रास नाही होणार
महापालिकेने शहरातील नागरिकांना चांगल्या दर्जाच्या पायाभूत सुविधा देऊन कोल्हापूर शहर एक आदर्श शहर बनवावे. सेवेतून शहरलगतच्या गावातील ग्रामस्थांमध्ये विश्वास निर्माण करावा. असे झाल्यास हद्दवाढीसाठी त्रास होणार नाही, असेही आमदार चंद्रकांत म्हणाले.