प्रतिनिधी / सातारा :
महाराष्ट्र राज्य केंद्र प्रमुख संघाने केंद्रप्रमुखांच्या विविध मागण्यांसाठी राज्यभर एकदिवशीय धरणे आंदोलन केले. साताऱ्यात देखील संघाच्या सातारा जिल्हा शाखेतर्फे जिल्हाध्यक्ष रमेश लोटेकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करुन मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना देण्यात आले.
जिल्हाधिकाऱ्यांमार्फत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीम यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी 1995 साली केंद्रप्रमुख पदाची निर्मिती झाली. या केंद्रप्रमुखांच्या मागण्याबाबत अनेकदा निवेदने देण्यात आलेली आहेत. मात्र शासनाकडून केंद्रप्रमुखांच्या मागण्यांवर काहीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे आम्ही राज्यभर आंदोलन करत आहे.
केंद्रप्रमुखांना वर्ग दोन पदाचा लाभ द्यावा, केंद्रप्रमुखांचा बंद असलेला प्रवास भत्ता इतर पात्र कर्मचाऱ्यांप्रमाणे सन 2010 पासून सुधारित दराने द्यावा, रिक्त जागा तातडीने भराव्यात, केंद्र शाळांची पुनर्रचना करावी, शिक्षणविस्तार अधिकारी श्रेणी 2 पदोन्नत्तीसाठी फक्त केंद्रप्रमुखांचा विचार करावा, कायम प्रवास भत्त्यात सुधारणा करावी, वेतनवाढ देवून अभावित केंद्रप्रमुखांना कायम करावे, या प्रमुख मागण्या तातडीने मंजूर कराव्यात.
या आंदोलनात केंद्रप्रमुख संघाचे राज्य नेते विठ्ठल माने, सातारा जिल्हाध्यक्ष रमेश लोटेकर, उपाध्यक्ष अरविंद दळवी, कार्याध्यक्ष श्रीनिवास पवार तसेच बाळासाहेब पवार, संपत धनावडे आदी सहभागी झाले होते.









