लंडन / वृत्तसंस्था
इंग्लंडचा अनुभवी अष्टपैलू मोईन अली कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होणार असल्याचे वृत्त ब्रिटीश प्रसारमाध्यमांनी सोमवारी दिले. मोईनने यापूर्वीच आपला निर्णय कर्णधार जो रुट व मुख्य प्रशिक्षक ख्रिस सिल्वरवूड यांना कळवला असल्याचे या वृत्तात म्हटले आहे. 34 वर्षीय मोईन अलीने 64 कसोटी सामन्यात 28.29 च्या सरासरीने 2914 धावांचे योगदान दिले. शिवाय, ऑफस्पिन गोलंदाजीवर 36.66 च्या सरासरीने 195 बळी घेतले आहेत.
2019 ऍशेसनंतर फारसे कसोटी क्रिकेट न खेळलेल्या मोईन अलीला मायदेशात भारताविरुद्ध मालिकेसाठी संघात पाचारण केले गेले होते. मोईन अलीने कुटुंबापासून अधिक वेळ दूर रहावे लागू नये, यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे वृत्त आहे. मोईन सध्या चेन्नई सुपरकिंग्सचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी संयुक्त अरब अमिरातीत आहे. इंग्लंडतर्फे, तसेच वर्सेस्टरशायरकरिता कौंटी क्रिकेट, प्रथमश्रेणी क्रिकेट खेळण्याकरिता आपण उपलब्ध असू, असे त्याने यावेळी म्हटले आहे. युएई व ओमानमध्ये होणाऱया आगामी टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी त्याचा इंग्लिश संघात समावेश आहे.
यापूर्वी भारताविरुद्ध पाचव्या कसोटी सामन्यात तो कसोटी इतिहासात 3 हजार धावा व 200 बळी नोंदवणारा 15 वा खेळाडू ठरण्याच्या उंबरठय़ावर होता. मात्र, ती लढत कोव्हिड-19 च्या धोक्यामुळे रद्द केली गेली.









