कोरोना प्रादुर्भावामुळे मर्यादित कार्यक्रमाचा निर्णय : पालकमंत्री उदय सामंत यांची पत्रकार परिषदेत माहिती
मुख्यमंत्र्यांसह केंद्रीय, राज्यातील मंत्री, आमदार, खासदारांची उपस्थिती
जनतेसाठी कार्यक्रमाचे होणार लाईव्ह प्रक्षेपण
पाऊस गेल्यानंतर लगेचच रस्त्यांच्या कामांना सुरुवात!
प्रतिनिधी / परुळे:
परुळे-चिपी येथे साकारण्यात आलेल्या सिंधुदुर्ग विमानतळाचा शुभारंभ 9 ऑक्टोबर रोजी निमंत्रित मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय हवाईमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, केंद्रीय लघुउद्योगमंत्री नारायण राणे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती जिल्हय़ाचे पालकमंत्री उदय सामंत यांनी चिपी विमानतळ टर्मिनल सेंटर येथे सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विमानतळ शुभारंभाचा कार्यक्रम जाहीरपणे होणार नसून निमंत्रितांच्या प्रमुख उपस्थितीत होईल. हा कार्यक्रम सर्वांसाठी यू-ट्य़ूब आणि फेसबूकच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपित करण्यात येईल. याचा सर्वांनी लाभ घ्यावा तसेच विमानतळ परिसरात अचानक आलेल्या लोकांसाठी कॅम्पसच्या बाहेर दोन मंडप घालून मोठय़ा दोन एलईडी स्क्रिनच्या माध्यमातून हा कार्यक्रम लाईव्ह दाखविला जाईल. जिल्हय़ात अजूनही कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने हा कार्यक्रम जाहीरपणे होणार नाही. याकरिता निमंत्रित मान्यवर, पत्रकार आणि विमानातून येणाऱया प्रवाशांची उपस्थिती असेल.
गरज पडल्यास आणखी विमाने सुरू करू!
पालकमंत्री सामंत म्हणाले, कार्यक्रमाला राज्यासह केंद्रीय मंत्रीही उपस्थित राहणार आहेत. जिल्हय़ातील मान्यवरांनाही निमंत्रण दिले जाणार आहे. विमानतळाचे श्रेय कोणाला आहे, यापेक्षा सिंधुदुर्गवासीयांचे स्वप्न पूर्ण होत आहे, याचाच सर्वांना आनंद आहे. विमानतळाचे काम करीत असताना ज्यांनी-ज्यांनी योगदान दिले आहे, त्यांना निमंत्रित केले जाईल. माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्याशी आपण स्वतः बोलून त्यांनाही निमंत्रित करणार आहे. मुंबई विमानतळावर सकाळी स्लॉट मिळत नसल्याने दुपारच्या सत्रात मुंबई-सिंधुदुर्ग विमान सेवा सुरू होत आहे. एकच विमान नाही, तर गरज पडल्यास या जिल्हय़ातील पर्यटनासाठी पाच ते सहा विमाने सुरू करण्याची आमची तयारी आहे. त्यासाठी काही सुविधा लागणार आहेत, असे सामंत म्हणाले.
33 केव्ही वीज लाईनसाठी प्रयत्न
सध्या विमानतळावर 11 केव्ही लाईनवरून वीजपुरवठा सुरू असून 9 रोजी याच वीज सेवेवर सकाळी विमानसेवेचे उद्घाटन होणार आहे. भविष्यात नाईट सेवेसाठी 33 केव्ही लाईनची गरज आहे. त्याचे नियोजन सुरू आहे, असे सामंत म्हणाले.
पालकमंत्री तिकीट दराबाबत अनभिज्ञ
मुंबईहून सिंधुदुर्गात येण्याचा विमानाचा तिकीट दर 2550, तर जाताना 2621 रुपये आहे. सिंधुदुर्ग विमानतळ उडान योजनेंतर्गत असल्याने तिकीट दर कायमस्वरुपी एकच राहणार असे, सांगितले जात होते मात्र एअर इंडियाच्या अधिकाऱयांनी तिकीट दर बदलते राहणार, असे सांगितल्याने सिंधुदुर्गवासीय संभ्ा्रमात आहेत, याकडे पालकमंत्र्यांचे लक्ष वेधले असता, तेही तिकीट दराबाबत अनभिज्ञ असल्याचे स्पष्ट झाले. त्यांनी अधिक माहिती घेऊन दराबाबत जिल्हावासीयांना दिलासा देण्यात येईल, असे सांगितले. पावसामुळे रस्त्यांची कामे थांबली आहेत. पाऊस गेल्यावर तात्काळ रस्त्यांची कामे सुरू होतील. तशा प्रकारच्या वर्कऑर्डर संबंधित विभागाला देण्यात आल्या आहेत, असे ते म्हणाले.
शुभारंभप्रसंगी मान्यवरांची उपस्थिती
विमानतळाच्या शुभारंभाला कार्यक्रमपत्रिकेनुसार मान्यवर उपस्थित राहणार आहेत, अशीही माहिती पालकमंत्री सामंत यांनी दिली. मुख्यमंत्री ठाकरे, हवाईमंत्री सिंधिया, केंद्रीय लघु व सुक्ष्म उद्योगमंत्री राणे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सुभाष देसाई, बाळासाहेब थोरात, पालकमंत्री सामंत, आदिती तटकरे, खासदार सुरेश प्रभू, खासदार विनायक राऊत, आमदार धनंजय डावखरे, आमदार बाळा पाटील, आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, आमदार नीतेश राणे, जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत, दीपक कपूर, आयआरबीचे वीरेंद्र म्हैसकर आदी उपस्थित राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली. आमदार नाईक, संदेश पारकर व शिवसेनेचे पदाधिकारी आदी यावेळी उपस्थित होते.
पत्रकारांना चांगली वागणूक दिली जाईल!
सिंधुदुर्ग विमानतळाच्या विविध पत्रकार परिषदांना पत्रकारांना निमंत्रित केले जाते. मात्र, संबंधित अधिकाऱयांकडून त्यांना चांगली वागणूक दिली जात नसल्याने पत्रकारांनी पालकमंत्र्यांकडे तक्रार केली. त्यावर पालकमंत्री सामंत यांनी भविष्यात असे प्रकार घडणार नाहीत, याची काळजी माहिती प्रशासन अधिकाऱयांनी घ्यावी अन्यथा गाठ माझ्याशी आहे, असे सुनावले. तसेच विमानतळाच्या उद्घाटनावेळीही पत्रकारांचा उचित सन्मान केला जाईल, असेही यावेळी त्यांनी आश्वासित केले.
आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी प्रयत्न!
भविष्यात हे विमानतळ आंतरराष्ट्रीय व्हावे, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या मार्गदर्शनातून प्रयत्न करणार आहोत. पहिले विमान मुंबई-सिंधुदुर्ग-मुंबई असे असेल. भविष्यात शिर्डी, तिरुपती, दिल्ली विमानसेवा सुरू करण्याचा मानस आहे, असे पालकमंत्री म्हणाले.









