लोणंद / वार्ताहर :
लोणंद रेल्वे स्टेशननजीक रविवारी सायंकाळी बेंगळूर-जोधपुर एक्सप्रेसने धडक दिल्याने अंदोरी ता. खंडाळा येथील एसआरपीमध्ये कार्यरत असणारे शैलेश बोडके (वय 28) आणि त्यांच्या एक वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेची नोंद सातारा रेल्वे पोलीस स्टेशनला करण्याचे काम रात्री उशिरापर्यत सुरु होते.
याबाबत रेल्वे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अंदोरी ता. खंडाळा येथील
शैलेश ज्ञानेश्वर बोडके धुळे येथे एसआरपीमध्ये कार्यरत आहेत. तर त्यांची पत्नी मुंबई पोलीसदलामध्ये आहे. शैलेश बोडके दोन दिवसांपूर्वी सुट्टीवर अंदोरी येथे घरी आले होते. रविवारी सायंकाळी आपल्या मुलासह तो लोणंद रेल्वे स्टेशनवर गेला असता बेंगळूर-जोधपुर रेल्वेच्या धडकेमध्ये दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेचा पंचनामा करण्याचे काम रात्री उशिरापर्यत सुरु होते. रेल्वे पोलिसांनी लोणंद प्राथमिक आरोग्य केंद्रात या बापलेकाचे शवविच्छेदन करुन मृतदेह अंत्यविधीसाठी नातेवाईच्या ताब्यात दिला आहे.









