आज विशेष बैठकीचे आयोजन
प्रतिनिधी /बेळगाव
एरवी स्थानिक स्वराज्य संस्था किंवा राज्य शासनाचा अर्थसंकल्प मार्चअखेर पर्यंत मंजूर केला जातो. मात्र अर्धे वर्ष संपले तरी बुडाचा अर्थसंकल्प अद्याप तयार झाला नाही. अर्थसंकल्पावर चर्चा करण्यासाठी सोमवार दि. 27 रोजी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी कणबर्गी योजनेच्या अंमलबजावणीच्या विषयावर चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे.
फेब्रुवारी ते मार्च या दरम्यान अर्थसंकल्प केला जातो. एप्रिल ते मार्च या दरम्यान राबविण्यात येणाऱया विकास कामांसाठी तसेच कार्यालयीन कामाबाबत निधीची तरतूद केली जाते. याला सभागृहात मंजुरी देऊन एप्रिलपासून अर्थसंकल्पातील तरतूदीनुसार निधीचा विनियोग केला जातो. पण बुडा कार्यालयाचे कामकाज गेल्या सहा महिन्यांपासून अर्थसंकल्पाविना सुरू आहे. बुडाची बैठक झाली नसल्याने अर्थसंकल्पावर चर्चा झाली नाही. परिणामी अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली नाही. अर्थसंकल्पावर चर्चा करण्यासाठी सोमवारचा मुहूर्त मिळाला आहे. या बैठकीच्या अजेंडय़ावर अर्थसंकल्पाचा मुख्य विषय असून अन्य विविध विषयांवरही चर्चा करण्यात येणार आहे. नोव्हेंबरमध्ये बुडाची बैठक पार पडली होती. त्यानंतर बैठक झाली नसल्याने कामकाज रखडले आहे. काही महत्त्वाच्या विषयांवरही बैठकीत चर्चा करून निर्णय घेतले जाणार आहेत. अर्थसंकल्पाक्यतिरिक्त कणबर्गी योजना राबविण्याबाबतचा विषय घेण्यात आला आहे. कणबर्गी योजनेच्या आराखडय़ाला राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी जमिनीचे सपाटीकरण आणि विकासकामे राबविण्यासाठी निविदा मागविणे आवश्यक आहे. याबाबत चर्चा करण्यासाठी हा विषय बैठकीच्या अजेंडय़ावर घेण्यात आला आहे. कणबर्गी वसाहत योजना राबविण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात येणार असून, त्यानंतर योजनेतील जागेचे मोजमाप आणि सपाटीकरणाचे काम सुरू करण्यात येणार आहे. तसेच जागेच्या विनियोगात बदल आणि लेआऊटच्या विषयावर चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.









