वृत्तसंस्था/ बोस्टन
लेव्हर चषक सांघिक टेनिस स्पर्धेत युरोप संघ आता जेतेपदाच्या समीप पोहचला आहे. युरोप संघाने यापूर्वी तीनवेळा ही सांघिक स्पर्धा जिंकली असून आता ते चौथ्या जेतेपदाच्या समीप आहेत.
युरोप संघातील ग्रीकचा टेनिसपटू सिट सिपेसने आपला एकेरीचा सामना जिंकला. त्यानंतर आंद्रे रूबलेव्हसमवेत त्याने दुहेरीचा सामना जिंकला. शनिवारी या स्पर्धेत युरोप संघाने आपले सर्व सामने जिंकले आहेत. आता त्यांना जगातील टॉप सीडेड संघाविरूद्ध आणखी एका विजयाची जरूरी आहे.
या स्पर्धेच्या दुसऱया दिवशी बोर्गच्या नेतृत्वाखाली युरोप संघाने प्रतिस्पर्धीं संघावर11-1 अशी आघाडी मिळविली आहे. चालूवर्षीच्या या स्पर्धेत फेडरर, नदाल आणि जोकोव्हिच हे सहभागी झाले नाहीत. पहिल्या दोन दिवसामध्ये युरोप संघाने सहा एकेरीचे सामने जिंकले आहेत. तीन दिवस चालणाऱया या स्पर्धेत युरोपमधील सहा अव्वल टेनिसपटूंच्या लढती शेषविश्वमधील सहा टेनिसपटूंबरोबर खेळविल्या जात आहेत. प्रत्येक दिवशी चार सामने खेळविले जातात. या स्पर्धेत 13 गुण मिळविणाऱया पहिल्या संघाला विजेता म्हणून घोषित केले जाते. गेल्यावर्षी कोरोना महामारीमुळे ही स्पर्धा रद्द करण्यात आली होती.
शनिवारी झालेल्या पहिल्या एकेरीच्या सामन्यात सिटसिपेसने किरगॉईसचा 6-3, 6-4 असा पराभव केला. या स्पर्धेच्या दुसऱया दिवशी सिट सिपेस आणि रशियाचा रूबलेव्ह यांनी दुहेरीच्या सामन्यात अमेरिकेचा इस्नेर ऑस्ट्रेलियाचा किरगॉईस यांचा 6-7 (8-6), 6-3 (10-4) असा पराभव केला. जर्मनीच्या व्हेरेव्हने एकेरीच्या सामन्यात अमेरिकेच्या इस्नेरचा 7-6 (5-7), 6-7 (6-8), 10-5, मेदव्हेदेवने कॅनडाच्या शेपोव्हॅलोव्हचा 6-4, 6-0 असा पराभव केला.









