वृत्तसंस्था/ येनकेटोन
येथे सुरू असलेल्या विश्व तिरंदाजी स्पर्धेत भारतीय तिरंदाजांना पुन्हा सुवर्णपदकाने हुलकावणी दिली. या स्पर्धेत भारताच्या महिला तिरंदाजांनी सांघिक आणि मिश्र दुहेरी कंपाऊंड प्रकारात रौप्यपदके पटकाविली.
विश्व तिरंदाजी स्पर्धेत यावेळी भारतीय तिरंदाज सुवर्णपदक मिळवतील अशी आशा निर्माण झाली होती. विश्व तिरंदाजी स्पर्धेत भारतीय तिरंदाजांना अद्याप सुवर्णपदक मिळविता आलेले नाही. या स्पर्धेमध्ये भारतीय तिरंदाजांनी विविध आठ प्रकारामध्ये अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. पण, त्यांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
मिश्र सांघिक कंपाऊंड प्रकारातील अंतिम लढतीत कोलंबियाच्या तिरंदाजांनी भारताच्या अभिषेक वर्मा आणि ज्योती सुरेखा यांचा 154-150 गुणांनी पराभव करत सुवर्णपदक पटकाविले. मिश्र दुहेरीच्या कंपाऊंड तिरंदाजी प्रकारात भारताला पुन्हा रौप्यपदक मिळाले.
महिलांच्या सांघिक कंपाऊंड प्रकारात कोलंबियाच्या सारा लोपेझ, युसक्वेनो आणि व्हॅलडेझ यांनी भारताच्या ज्योती सुरेखा, मुस्कान किरेर आणि प्रिया गुर्जर यांचा 229-224 गुणांनी पराभव करत सुवर्णपदक पटकाविले. कंपाऊंड तिरंदाजी प्रकारामध्ये कोलंबियाच्या तिरंदाजांनी आपले वर्चस्व सिद्ध करताना सुवर्णपदक मिळविले. विश्व तिरंदाजी स्पर्धेत कोलंबियाने आतापर्यंत चार सुवर्णपदके मिळविली आहेत. या स्पर्धेत वैयक्तिक कंपाऊंड प्रकारात भारताचे तिरंदाज अभिषेक वर्मा आणि ज्योती सुरेखा यांच्या उपांत्यपूर्व लढती होणार आहेत. रिकर्व्ह तिरंदाजी प्रकारात भारताच्या अंकिता भक्तने शेवटच्या आठ खेळाडूंमध्ये स्थान मिळविले आहे.









