आमदार वैभव नाईक यांची माहिती
कणकवली / प्रतिनिधी:
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, राज्य आपत्ती व्यवस्थापन विभाग यांच्या माध्यमातून तसेच पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, माजी राज्यमंत्री दीपक केसरकर व आपल्या पाठपुराव्यातुन सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी पुन्हा एकदा नवीन १४ रुग्णवाहिका वितरित करण्यात आल्या आहेत, अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली.यातील ११ रुग्णवाहिका प्राथमिक आरोग्य केंद्रांना देण्यात येणार आहेत.त्याचबरोबर कणकवली उपजिल्हा रुग्णालयाला १ , सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला १ व पेंडूर ग्रामीण रुग्णालयाला १ रुग्णवाहिका देण्यात येणार आहे. मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार हे सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले असताना रुग्णवाहिका देण्याची मागणी खासदार विनायक राऊत यांनी केली होती. ती मागणी पूर्ण करण्यात आली आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये दोडामार्ग तालुक्यातील साटेली-भेडशी व तळकट, कणकवली तालुक्यातील कनेडी, कुडाळ तालुकयातील कडावल, पणदूर, वालावल, मालवण तालुक्यातील गोळवण, सावंतवाडी तालुक्यातील निरवडे, सांगेली, वेंगुर्ले तालुक्यातील परुळे, रेडी या ११ प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका देण्यात येणार आहे.याआधीहि राज्यसरकाच्या माध्यमातून जिल्ह्याला रुग्णवाहिका देण्यात आल्या.
राज्यसरकारकडे केलेल्या मागणीनुसार प्राथमिक आरोग्य केंद्र, व रुग्णालयांची गरज ओळखून पुन्हा एकदा नवीन रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अशी माहितीही नाईक यांनी दिली असून त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले आहेत.