मुंबई/प्रतिनिधी
हॉल तिकीट गोंधळामुळे आधीपासूनच चर्चेत असलेली आरोग्य विभागाची जंबो भरती परीक्षा ऐनवेळी पुढे ढकलण्यात आली आहे. राज्य शासनाची आरोग्य विभागाची गट क व गट ड वर्गाची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. अनेक उमेदवाराच्या मोबाईलवर अधिकृत मेसेज पाठवण्यात आले आहेत. आरोग्य विभागाची परीक्षा ही २५ सप्टेंबर आणि २६ सप्टेंबर या दिवशी होणार होती. राज्यातील १५०० केंद्रांवर एकाच वेळी ही भरती प्रक्रिया शासनाने निवडलेल्या खासगी बाह्य स्त्रोतांमार्फत घेण्यात येणार होती. मात्र सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत गट क आणि गट ड प्रवर्गातील जागांसाठी होणारी भरती परीक्षा बाह्यस्त्रोत संस्था न्यासा यांच्या अकार्यक्षमतेमुळे पुढे ढकलण्यात येत असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. तसेच परीक्षा पुढे ढकलल्याने आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. पण ऐनवेळी परिक्षा रद्द झाल्यानं विद्यार्थ्यांना मनस्ताप झाला आहे.
आरोग्य विभागाच्या गट-क आणि ड संवर्गातील ६२०५ पदांची लेखी परीक्षा शनिवारपासून सुरू होणार होती. लेखी परीक्षेचे काम न्यासा या संस्थेला देण्यात आलं होते. तसेच उमेदवाराच्या ओळखपत्राचा गोंधळ अद्यापही संपलेला नाही. सार्वजनिक आरोग्य विभागाची परीक्षा लवकर घेण्यात येतील. व परीक्षेच्या नियोजित तारीख उमेदवाराना विभागच्या संकेतस्थळावरून तसेच ईमेलद्वारे कळवण्यात येणार आहे.
दरम्यान, राज्याच्या आरोग्य विभागाने अचानक परीक्षा रद्द केल्याने लाखो विद्यार्थ्यांना मानसिक त्रास झाला आहे. विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी इतर जिल्ह्यात गेले आहेत. परीक्षा अचानक रद्द केल्याचे सांगितल्यानंतर विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला. तर अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा रद्द झाली असल्याची कल्पनाही मिळाली नाल्याने ते आज सकाळी परीक्षा केंद्रावर हजर होते. यावेळी त्यांना परीक्षा रद्द झाल्याची माहिती मिळताच विद्यार्थ्यांना धक्का बसला.