बंद बसेस वरून संभ्रमावस्था : प्रवाशांमधून तीव्र संताप
दोडामार्ग / वार्ताहर:
गोव्यातून दोडामार्गात येणाऱ्या कदंबा बसेस काल गुरुवारी रात्रीपासून अचानक बंद करण्यात आल्या. या बसेस गोवा प्रशासनाने बंद केल्या की सिंधुदुर्ग प्रशासनाने बंद केल्या. याबाबत संभ्रम निर्माण झाला असून प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. दरम्यान ऐन चथुर्थी कालावधीतही अन्य खाजगी बसेस दोडामार्गात आणण्यात सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते सपशेल अपयशी ठरल्याची तीव्र प्रतिक्रिया प्रवाशांमधून उमटत आहे.
साधारणत: एक दीड महिन्यांपूर्वी गोवा व महाराष्ट्र सरकारने लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणली. त्याद्वारे अनेक ठिकाणी वाहतुकीचे मार्ग पूर्ववद खुले झाले. ऐन गणेश उत्सव काळात दोन्ही ठिकाणांहून मोठ्या प्रमाणावर ये जा सुरू झाली. गोव्यातील अनेकजण आपल्या दुचाकी, चारचाकी गोव्यातील व महाराष्ट्रातील पर्यायाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेकजण दोन्ही ठिकाणी ये जा करू लागले. विशेष म्हणजे गोव्यात कदंबा तर सिंधुदुर्गात एसटी बसेस देखील हळूहळू सुरू झाल्या. मात्र महाराष्ट्रात गोव्यातील खाजगी बसेसना परवानगी न दिल्याने अजूनही या बसेस दोडामार्ग शहराजीक महाराष्ट्र – गोवा सीमेवर येऊन थांबत आहेत. चतुर्थी कालावधीत गोव्याच्या ज्या कदंबा बसेस थेट दोडामार्ग तालुक्यातील उसप, मोर्ले, घोटगेवाडी या ठिकाणी येत होत्या त्या काल रात्री गुरुवारपासून अचानक बंद झाल्या. या बसेस नेमक्या कोणी बंद केल्या ? त्याबाबत संभ्रमावस्था वाढली असून प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. महाराष्ट्र सरकारने अद्याप आंतरराज्य वाहनांसाठी सीमा खुल्या केलेल्या नाहीत. त्यामुळे गोव्यातील खाजगी बसेसना अद्यापही प्रवेश बंदी आहे असे सांगण्यात येत आहे. तर मग खाजगी वाहने दोन्ही ठिकाणी ये जा कशी करतात ? तसेच या मिनी बसेस मधून कोरोना बसून येतो का ? असा उपोरोधीक सवाल विचारला जातो आहे. दरम्यान दोन्ही ठिकाणच्या शासकीय व खाजगी बसेसची वाहतूक पूर्वी प्रमाणे करण्याकडे दोडामार्ग तालुक्यातील विविध पक्षाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी दुर्लक्ष केल्याच्या संतप्त प्रतिक्रिया प्रवाशांमधुन व्यक्त होत आहेत.
Previous Articleविमानतळ रस्त्यावरील बॅनर ठरताहेत लक्ष्यवेधी
Next Article बांदा गांधीचौक नवरात्रौत्सव नियोजन बैठक शनिवारी









