प्रतिनिधी/ सातारा
फेब्रुवारी महिन्यापासून करंजे येथील काही भांगाना अपुऱया दाबाने पाणी पुरवठा होत आहे. त्याबाबत कित्येकवेळा पालिका, पाणी पुरवठा यांच्याकडे पाठपुरावा केला तरीही त्यांच्याकडून कोणतीही उपाययोजना होत नसल्याने बुधवारी संतप्त झालेल्या नागरिकांनी करंजे नाक्यावर अचानक रास्ता रोको केला. या आंदोलनामुळे तब्बल अर्धा तास वाहतुकीची कोंडी झाली होती. या आंदोलनाची माहिती मिळताच नगरसेवक बाळासाहेब ढेकणे यांनी मध्यस्थी केल्यानंतर नागरिकांनी आंदोलन स्थगित केले. तर पाणी पुरवठा सभापती सीता हादगे यांनी पत्रक काढून प्राधिकरणाला जबाबदार धरले आहे.
करंजे येथे सकाळी 11 च्या सुमारास अचानक नागरिकांना रस्त्यात हंडे, कळशा ठेवून रस्ता रोको केला. गेल्या फेब्रुवारी महिन्यापासून अतिशय अल्प दाबाने पाणी पुरवठा होत आहे. पाणी बिल मात्र अव्वाच्या सव्वा येत आहे. सेनॉर चौक ते यशवंत हॉस्पिटल या दरम्यान ही परिस्थिती सातत्याने होत आहे. त्यामुळे नागरिकांनी हा रस्ता रोको केला. यामुळे वाहतूक कोंडी अर्धा तास झाल्याची माहिती पालिकेमध्ये मिळताच नगरसेवक बाळासाहेब ढेकणे अणि पाणी पुरवठा सभापतींचे पती राम हादगे हे तेथे पोहोचले. नागरिक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. कितीवेळा अर्ज विनंत्या केल्या. पाणी पुरवठा विभागाचे कर्मचारी आमचे काम करत नाहीत, कोणतीही कार्यवाही करत नाहीत, असा आरोप नागरिकांनी केल्याने वातावरण तापले होते. दरम्यान, नगरसेवक बाळासाहेब ढेकणे यांनी नवीन पाईपलाईनचा विषय अजेंडय़ावर घेतला आहे. त्यामुळे लवकरच हा प्रश्न महाराजसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली सोडविण्यात येणार आहे. तुम्हाला मुबलक पाणी देण्यासाठी मी खंबीर आहे, असा विश्वास दिल्यानंतर नागरिकांनी ताप्तुरते आंदोलन स्थगित केले. मात्र, या आंदोलनामुळे वाहतुक ठप्प झाली होती.
पाण्यासाठी आंदोलनाला प्राधिकरणच जबाबदारः सौ. सीता हादगे
सातारा शहर परिसरात असणाऱया करंजे येथे कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्यामुळे तेथील नागरिकांनी पाण्यासाठी आंदोलन केल्याची माहिती मिळाली. पाणी हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार आहे. मात्र त्यासाठी आंदोलन करावे लागणे, ही दुःखद गोष्ट असून याला पूर्णतः महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी जबाबदार आहेत, असा आरोप पाणीपुरवठा सभापती सीता हादगे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.
पत्रकात म्हटले आहे, करंजे परिसरात कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याबाबत सातत्याने नागरिकांकडून तक्रारी प्राप्त होत होत्या. याबाबतची माहिती गेल्या अनेक महिन्यांपासून आपण स्वतः महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱयांना देत होतो. ज्या ठिकाणी कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे, त्या ठिकाणी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याच्या सूचना वेळोवेळी केल्या होत्या. दि. 17 सप्टेंबर रोजी मी स्वतः प्राधिकरणाच्या कार्यालयात जाऊन करंजे येथील कमी दाबाने होत असलेल्या पाणी पुरवठाबाबत माहिती दिली होती. यावेळी झालेल्या बैठकीत संबंधित परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून दोन दिवसात हा प्रश्न मार्गी लावू अशी ग्वाही संबंधित अधिकाऱयांनी दिली होती. दुर्दैवाने प्राधिकरणाने हा विषय गांभीर्याने न घेतल्यामुळे करंजे येथील ग्रामस्थांवर पाण्यासाठी आंदोलन करण्याची वेळ आली. प्राधिकरणाने आता तरी झोपेतून जागे होत मुबलक पाणीपुरवठा कसा होईल या दृष्टीने प्रयत्न करावेत, असे आवाहन पत्रकात करण्यात आले आहे.








