दुबई / वृत्तसंस्था
निसटत्या फरकाने आयपीएल सामने गमावणे हा आपल्या संघासाठी जणू पॅटर्नच झाला आहे, अशी खंत पंजाब किंग्स संघाचे मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी व्यक्त केली. राजस्थान रॉयल्सविरुद्ध शेवटच्या चेंडूवर 2 धावांनी निसटता पराभव पत्करावा लागल्यानंतर ते ऑनलाईन पत्रकार परिषदेत बोलत होते.
पंजाब संघाला शेवटच्या षटकात अवघ्या 4 धावांची गरज असताना देखील विजयापासून दूर रहावे लागले, ते धक्कादायक ठरले होते. राजस्थानचा जलद गोलंदाज कार्तिक त्यागीने त्या षटकात निकोलस पूरन व दीपक हुडा यांना बाद करत अव्वल मारा साकारला होता.
‘दुर्दैवाने, आम्ही हा सामना अगदी शेवटच्या षटकापर्यंत नेला. त्यातही शेवटच्या षटकातील शेवटच्या 2-3 चेंडूंवर नवे फलंदाज स्ट्राईकवर असताना तो जणू लॉटरीसारखाच प्रकार होता. पण, त्यागीने अतिशय नियंत्रित टप्प्यावर, लक्षवेधी मारा केला, हे मान्य करावे लागेल. ऑफ स्टम्पच्या वाईड आऊटसाईडवर सातत्याने मारा करणे इतके सोपे असत नाही. पण, त्याने ही बाब साध्य करुन दाखवली. आमचे फलंदाज अशा चेंडूवर एकही योग्य फटका मारु शकले नाहीत’, असे कुंबळे म्हणाले.
5 बळी घेणारा अर्शदीप, सातत्यपूर्ण मारा करणाऱया शमीचे देखील त्यांनी कौतुक केले. ‘येथील विकेट उत्तम होती. गोलंदाजी करत असताना आम्ही शेवटच्या 4 षटकात समयोचित मारा पेला. या मैदानाची एका बाजूची बाऊन्ड्री कमी अंतरावर तर दुसऱया बाजूची बाऊन्ड्री लांब अंतरावर आहे. राजस्थानचा संघ एकवेळ 200-210 धावसंख्येच्या दिशेने प्रवास करत होता. मात्र, शेवटच्या 4 षटकात 6 बळी घेणे लक्षवेधी ठरले’, असे त्यांनी तपशीलवार बोलताना स्पष्ट केले.









