प्रतिनिधी / कोल्हापूर
निवारा अपार्टमेंट माळी कॉलनी टाकाळा येथील फ्लॅटमध्ये आयपीएल मॅच बेटिंग घेताना स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने एकास ताब्यात घेतले. असिफ निसार कुडचीकर वय 52 रा. अरुण सरनाईक नगर, क्रांतिसिंह नाना पाटील नगर असे अटक केलेल्याचे नाव आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीसहेड कॉन्स्टेबल श्रीकांत गणपतराव मोहिते यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कुडचीकर याच्यावर राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, पंजाब किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल यांच्यामध्ये मंगळवारी आयपीएल सामना सुरू होता. या सामन्यावर माळी कॉलनी टाकाळा येथील निवारा अपार्टमेंटमधील विनय कुमार उर्फ, राजू दानय्या स्वामी यांच्या फ्लॅट नंबर 203 मध्ये कुडचीकर हा बेटिंग घेत असल्याची माहिती, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव यांना मिळाली. त्यानुसार गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक किशोर डोंगरे, पोलीस अंमलदार नेताजी डोंगरे, श्रीकांत मोहिते, उत्तम सडोलीकर, रणजित कांबळे, वैभव पाटील आणि संतोष पाटील यांच्या पथकाने फ्लॅटवर छापा टाकला. यावेळी कुडची कर बेटिंग घेत असल्याचे दिसून आले.
त्याच्याकडून रोख 24 हजार 700 रुपये, एलईडी टीव्ही, पाच मोबाईल हँडसेट, वही-पेन असा एकूण 53 हजार 302 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्याला राजारामपुरी पोलिस ठाण्यात हजर करत गुन्हा नोंद करण्यात आला. पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण या पथकाने कारवाई केली.









