ऑनलाईन टीम / इस्लामाबाद :
अफगाणिस्तानात तालिबानला सत्ता स्थापनेसाठी पाकिस्तानने जाहीरपणे मदत केली. आता अफगाणिस्तानवर आपलं नियंत्रण राहावे, यासाठी पाक लष्कर आणि गुप्तचर यंत्रणेत चढाओढ सुरू आहे.
अफगाणिस्तानातील तालिबान सरकारवर प्रभाव ठेवण्यासाठी आणि तेथील निर्णय प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी पाक लष्कर आणि आयएसआय ही गुप्तचर यंत्रणा आमने-सामने आली आहे. दोन्ही यंत्रणेच्या प्रमुखांमधील वाद विकोपाला गेला असून, पाक लष्कर प्रमुख जनरल कमर जावेद बाजवा हे आयएसआयचे प्रमुख लेफ्टनंट जनरल फैज हमीद यांना पदावरुन हटविण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, गुप्तचर यंत्रणेचा प्रभाव पाहता बाजवा यांना यात यश आले नाही.
दरम्यान, पाकची गुप्तचर यंत्रणा आयएसआय अनेक वर्षांपासून तालिबानला मदत करत आहे. अफगाणिस्तानात आयएसआयचे लोक असून त्यांच्याकडे शस्त्रसाठादेखील आहे. तसेच काही महत्वाचे लोक त्यांच्या संपर्कात आहेत. त्यामुळे आयएसआय पाक लष्करप्रमुख बाजवा यांना अफगाणिस्तानात त्यांचा अजेंडा राबवण्यापासून विरोध करत आहे.