पंचवीस दिवसांपूर्वी खोदकाम ः काम पूर्ण करण्याकडे संबंधितांची पाठ
प्रतिनिधी/ बेळगाव
शहराची मुख्य बाजारपेठ असणाऱया किर्लोस्कर रोड येथे ड्रेनेजची खोदाई करून ठेवण्यात आली आहे. पंचवीस दिवस उलटले तरी अद्याप हे काम पूर्ण करण्यात आलेले नाही. ड्रेनेज खुली करण्यात आल्याने त्यामध्ये पडून अपघात होण्याची शक्यताही व्यक्त होत आहे. त्यामुळे या ड्रेनेजचे लवकर बांधकाम करावे, अशी मागणी स्थानिक नागरिक व व्यापाऱयांमधून केली जात आहे.
गणेशोत्सवापूर्वी या कामाला सुरुवात करण्यात आली होती. परंतु खोदाई केल्यानंतर संबंधित कर्मचारी फिरकलेच नसल्याने हे काम अर्धवट स्थितीत पडून आहे. ड्रेनेज खुली असल्याने रात्रीच्यावेळी अंदाज न आल्याने यामध्ये पडण्याची शक्यता आहे. एखाद्या निरपराध्याचा जीव जाण्यापूर्वी या ड्रेनेजची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
व्यापाऱयांमधून नाराजी
ऐन बाजारपेठेत खोदकाम केल्याने त्याचा फटका वाहन चालकांसह व्यापाऱयांनाही बसत आहे. गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी शहरात येणाऱया नागरिकांना या खोदाईचा सामना करावा लागला. रस्त्याच्यामध्येच माती व इतर साहित्य टाकण्यात आल्याने येण्या-जाण्याचाही मार्ग अरुंद झाला आहे. त्यामुळे याचा परिणाम व्यापारावर होत असल्याने व्यापाऱयांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.









