प्रतिनिधी /बेळगाव
शारदोत्सव महिला सोसायटीतर्फे आयोजित राजहंसगड हेरिटेज वॉकला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शुक्रवारी सुमारे 70 हून अधिक महिला यामध्ये सहभागी झाल्या होत्या. सकाळी 6.30 वाजता गोवावेस येथे सर्व जमून गडभ्रमंतीला सुरुवात करण्यात आली. प्रारंभी सर्वांनी शारदेची प्रार्थना व स्फूर्ती गीत म्हटले.
हिरकणी हाईकर्सचे नितीन कपिलेश्वरी व अनिल चौधरी व त्यांच्या टीमने गडाबद्दल माहिती दिली. राजहंसगड हा टेहळणीचा किल्ला म्हणून प्रसिद्ध आहे. सुमारे 9 ते 12 व्या शतकात रट्ट घराण्याने बांधलेला असावा, असा तर्क आहे. किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व, त्याच्या बांधणीबद्दल सविस्तर सांगितले. या गडावर 7 ते 8 राजकर्त्यांनी राज्य केले. किल्ल्यातील प्रत्येक चिरा कल्पकतेने बसविलेला आहे. याला गोमुखी प्रवेशद्धार आहे. शत्रुला पटकन हल्ला करता येवू नये अशा प्रकारे हे प्रवेशद्वार बनविण्यात आले आहे. बुरुज असे वळविले आहेत की पटकन याचे दरवाजे दिसत नाहीत, अशी याची वैशिष्टय़पूर्ण बांधणी आहे. चुन्यात बांधकाम असल्यामुळे या किल्ल्याची तटबंदी अजूनही मजबूत आहे. किल्ल्याला चार बुरुज आहेत.
यावेळी महिलांसाठी गडासंबंधीची प्रश्नमंजुषा घेण्यात आली. त्यानंतर अध्यक्षा माधुरी शानभाग यांच्यातर्फे सर्वांना अल्पोपहार देण्यात आला. संचालक मंडळ व कार्यकारिणीतील सदस्य उपस्थित होते. भरतेश विद्यालयातर्फे बसची व्यवस्था करण्यात आली.









