हलगा येथील युवक सुशांत लोहारने पहिल्यांदाच साकारली गणेशमूर्ती
वार्ताहर /किणये
गणेशोत्सवाला मोठय़ा उत्साहात व भक्तीमय वातावरणात प्रारंभ होऊन आठ दिवस उलटले. भाविकांमध्ये नवचैतन्य निर्माण करणारा हा उत्सव वेगवेगळय़ा स्वरुपात साजरा करण्यात येतो. कोणत्याही मंगलकार्याची सुरुवात ही गजाननापासून केली जाते. हीच आस्था बाळगून हलगा येथील एका 20 वषीय तरुणाने पहिल्यांदाच गणरायांची मूर्ती बनवून आपल्या कलेची सुरुवात केली आहे.
सिंहासनावर आरूढ गणरायाची ही मूर्ती आकर्षक बनविली असून, ती मूर्ती गावातील मरगाई गल्लीमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला देण्यात आली आहे. आपल्याच गावातील तरुणाने ही मूर्ती बनविली असल्याने त्या मूर्तीची मोठय़ा भक्तिभावाने प्रतिष्ठापना करून ‘हलग्याचा सम्राट’ असा सोहळाही करण्यात आला.
सदर मूर्ती सुमारे दहा फूटाहून अधिक उंच आहे. ही मूर्ती बनविण्यासाठी सुशांतला दोन महिन्यांचा कालावधी लागला. सुशांतने बनविलेल्या या बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातील नागरिक येत असून त्याचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.
सुशांतला लहानपणापासूनच कलेची आवड आहे. आयटीआय मॅकेनिकल केल्यानंतर त्याने कोल्हापूर येथे कला मंदिर महाविद्यालयात प्रथम वर्षाचे शिक्षण पूर्ण केले असून तो यावषी द्वितीय वर्षात शिक्षण घेणार आहे. गावातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासाठी गणेशाची मूर्ती बनविण्याचा त्याने संकल्प केला व यासाठी लागणारे साहित्य जमा करून अगदी सुबक अशी गणेशमूर्ती बनविली. इतक्या लहान वयात त्याने केलेल्या कार्याची गावकऱयांनी दखल घेतली असून हलगा गावाला एक उदयोन्मुख मूर्तीकलाकार लाभला असल्याचे समाधान ग्रामस्थांनी व्यक्त केले आहे.