3 लाख 60 हजाराहून अधिक किंमतीचा अन्नपदार्थांचा साठा जप्त
प्रतिनिधी / सांगली
अन्न व औषध प्रशासनाने मे. मालगावे अँड मिल्क प्रोडक्टस एमआयडीसी मिरज या ठिकाणी भेट देवून पनीर, खवा, दुध पावडर, म्हैस दुध यांचे नमुने तपासणीसाठी घेवून उर्वरीत 1 लाख 58 हजार 520 रूपये किंमतीचा साठा भेसळीच्या संशयावरून जप्त केला. तसेच बेकरी दुकानांना कच्चा मालाचा पुरवठा करणाऱ्या पुरवठादार मे. गणेश ट्रेडर्स, राम मंदीर जवळ सांगली येथे छापा टाकून रिफाईन्ड पामोलिन तेल, टुटी फ्रुटी, करोंदा यांचे नमुने तपासणीसाठी घेवून उर्वरीत 2 लाख 2 हजार 733 रूपये किंमतीचा साठा भेसळीच्या संशयावरून जप्त केला. या अहवालांचे प्रयोगशाळेकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर कायद्यातील तरतुदीनुसार पुढील कारवाई करण्यात येणार आहे. अशी माहिती सहायक आयुक्त अन्न सु. आ. चौगुले यांनी दिली.
मे. मालगावे अँड मिल्क प्रोडक्टस एमआयडीसी मिरज ही संस्था उत्पादक असून त्यांनी अन्न पदार्थांच्या उत्पादन कामी नियमांचे पालन केले नाही. ही संस्था विनापरवाना व्यवसाय करीत होती. अन्न सुरक्षा व मानदे प्राधिकरण यांच्या निर्देशाप्रमाणे मिठाई उत्पादन व विक्रेते यांनी मिठाई साठविण्यात आलेल्या शोकेसवर मिळाईचा बेस्ट बिफोर कालावधीचा दिनांक नमुद करणे बंधनकारक आहे. या निर्देशांचे उल्लंघन करणाऱ्या मिठाई दुकानांविरूध्द कायदेशीर कारवाई होवू शकते. याची मिठाई विक्रेत्यांनी नोंद घ्यावी. या निर्देशांचे उल्लंघन करणाऱ्या 6 मिठाई दुकांनाविरूध्द दि. 15 व 16 सप्टेंबर 2021 रोजी तडजोड प्रकरणे दाखल होत त्यांना 43 हजार रूपये इतका दंड करण्यात आल्याचे चौगुले यांनी सांगितले. ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी र. ल. महाजन, श्रीमती हिरेमठ, श्रीमती फावडे, श्रीमती पवार, केदार यांनी केली.