ऍड. दीपक तिळवे यांचे प्रतिपादन : सम्राट क्लब माशेलतर्फे भजन कार्यशाळा
प्रतिनिधी / पणजी
गोमंतकीय पारंपरिक भजन कलेचे जतन व संवर्धन गोव्यातील भजन कलाकारांनी केले पाहिजे. ही कला जपण्यासाठी कलाकार, संस्थांनी प्रयत्न केले पाहिजे. या कलेमुळे गोव्याची एक वेगळी ओळख होते, असे प्रतिपादन ऍड. दीपक तिळवे यांनी माशेल – बाजारवाडा येथील विठ्ठल मंदिरात आयोजित भजन कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी केले.
सम्राट क्लब माशेलतर्फे आयोजित भजन कार्यशाळेच्या उद्घाटन सोहळ्य़ात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ऍड. सतीश पिळगावकर, माशेल महाशाला कलासंगम अध्यक्ष उल्हास फुलारी, प्रशिक्षक पांडुरंग राऊळ, सम्राट क्लब माशेलच्या अध्यक्ष काजल चोडणकर, कार्यशाळा संयोजक सर्वेश फुलारी आदी उपस्थित होते. सुरुवातीला काजल चोडणकर यांनी प्रास्ताविक केले. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले.
सतीश पिळगावकर यांनी माशेल सम्राट क्लबने आतापर्यंत सम्राट क्लबच्या उद्दिष्टाला सार्थ ठरवणारे व कला आणि संस्कृती जतन व संवर्धन करणारे आगळे वेगळे असे कार्यक्रम करुन एका वर्षाच्या आत नवा विक्रम प्रस्थापित केल्याचे त्यांनी सांगितले. उल्हास फुलारी यांनी माशेल सम्राट क्लबला शुभेच्छा देताना क्लबची अशीच प्रगती होवो अशी विठ्ठलाचरणी प्रार्थना केली.
साथी कलाकार मिलींद परब, कृष्णा परब तसेच सर्व मान्यवरांना स्मृतीचिन्ह काजल चोडणकर यांनी भेट दिले. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी सर्वेश फुलारी, मनोजकुमार घाडी, दिगंबर कोलवाळकर यांनी सहकार्य केले. संपूर्ण दिवस चाललेल्या या कार्यशाळेला 25 च्या वर भजनप्रेमींनी नोंदणी केली आहे. सूत्रसंचालन व अभारप्रदर्शन मनोज कारापूरकर यांनी केले. तद्नंतर पांडुरंग राऊळ यांनी सहभागी भजनप्रेमींना मार्गदर्शन केले.









