महापालिका आयुक्त रुदेश घाळी यांचा महसूल विभागाच्या कर्मचाऱयांना आदेश
प्रतिनिधी /बेळगाव
महापालिकेच्यावतीने मालमत्ता करवसुली व सर्वेक्षण करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. पण सध्या सर्वेक्षणाची मोहीम थांबविण्यात आली असल्याने ही मोहीम पुन्हा राबवून महसूल वसूल करण्यावर भर द्या, उद्दिष्टपूर्तीसाठी सतत कार्यरत राहण्याची सूचना करून लीज संपलेल्या जागांची माहिती घेण्याचा आदेश महसूल विभागाच्या कर्मचाऱयांना महापालिका आयुक्त रुदेश घाळी यांनी दिला.
महापालिका आयुक्तांनी कार्यभार घेतल्यानंतर विविध विभागाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी विभागवार बैठका घेण्याचा सपाटा चालविला आहे. बुधवारी महसूल विभागाच्या अधिकाऱयांची व कर्मचाऱयांची बैठक घेतली. आतापर्यंत राबविण्यात आलेल्या मोहिमेचा आढावा घेऊन वॉर्डस्तरीय महसूल वसुलीची माहिती घेतली.
2021-22 अर्थिक वर्षात 50 कोटी मालमत्ता कर वसूल करण्याचे उद्दिष्ट आहे. तसेच 2021-22 आर्थिक वर्षात एप्रिलपासून आतापर्यंत 27 कोटींची घरपट्टी जमा झाली आहे. ऑनलाईन सुविधेमुळे हा महसूल नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने जमा केला आहे. पण घरपट्टी वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कर्मचाऱयांचा कस लागतो आहे. यामुळे महसूल उद्दिष्ट पूर्ण होण्यात महसूल विभागाच्या कर्मचाऱयांची कामगिरी मोलाची आहे. तसेच निर्दिष्ट मालमत्ता करवसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याकरिता करवसुलीवर अधिक भर देण्याची सूचनाही आयुक्तांनी केली.
तसेच सध्या पुनर्रसर्वेक्षणाचे काम बंद आहे. त्यामुळे त्यांनी मालमताचे पुनर्रसर्वेक्षण करण्याचा आदेश बजावला. अनधिकृत कामे करू नका, काही अडचण किंवा सहकार्य हवे असल्यास निडरपणे सांगण्याची सूचना केली.
मनपाला आवश्यक असलेल्या जागा राखीव ठेवण्याची सूचना
लीज संपलेल्या मनपाच्या जागांची माहिती घेऊन पुन्हा लिलाव करावा. मनपाला आवश्यक असलेल्या जागा राखीव ठेवण्याची सूचना केली. खाते बदलाच्या फाईल प्रलंबित ठेवू नका. 45 दिवसांत सर्व खाते बदलाच्या फाईल निकालात काढण्याची सूचना आयुक्तांनी केली. महसूल वसुलीबाबत चर्चा करण्यासाठी आयोजित बैठकीत महापालिका आयुक्तांनी विविध सूचना केल्या. तसेच नागरिकांची कामे वेळेत करून तक्रारी येणार नाहीत, याची दक्षता घेण्याचा आदेश महापालिका आयुक्तांनी कर्मचाऱयांना दिला. बैठकीला महसूल निरीक्षक, वॉर्ड क्लार्क व महसूल विभागातील कर्मचारी उपस्थित होते.









