मुंबई/प्रतिनिधी
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांनी मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना लक्ष केलं आहे. वडेट्टीवार यांनी विरोधकांच्या टीकेला पलटवार केला आहे. माझ्या राजीनाम्याने प्रश्न सुटणार असेल तर राजीनामा देतो, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. तसेच ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सर्वच राजकीय पक्षांची भूमिका दुटप्पी असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
वडेट्टीवार यांनी राज्यातल्या ओबीसी आरक्षणाचा प्रश्न अजूनही सुटेल असं दिसत नाही. आगामी पोटनिवडणुकांच्या बाबतीत अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी याविषयी आपलं मत मांडलं आहे. तसेच त्यांनी विरोधकांच्या टीकेवर पलटवार करत मी राजीनामा देण्याची तयारीही दाखवली आहे, असे ते म्हणाले.
दरम्यन, माध्यमांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले, संपूर्ण देशातलं ओबीसी आरक्षण सध्या धोक्यात आलेलं आहे. अशा परिस्थितीत आमचं डेटा एकत्र करण्याचं काम आम्ही करुच. मात्र आम्हाला अध्यादेश काढून या निवडणुका पुढे ढकलता येतात का याचा विचार आम्ही करु. काहीही मार्ग सापडला नाही तर सर्वच पक्षांनी निवडणुकांना ओबीसी उमेदवार उभे करावेत.
पाच जिल्ह्यात ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होत आहेत. याला काँग्रेस जबाबदार नाही. याला भाजपच जबाबदार आहे. हे त्यांनी मान्य करावं. महाविकास आघाडी ओबीसी आरक्षण जाण्यास जबाबदार असल्याचं त्यांना वाटत असेल तर ते जनतेची दिशाभूल करत आहेत. ओबीसींच्या जखमेवर मीठ चोळणारे आहे. तत्कालीन सरकारने पाठवलेले ते सहा पत्रं त्याचा पुरावा आहे, असं वडेट्टीवार म्हणाले.