वार्ताहर / वरकुटे-मलवडी :
माण तालुक्यातील वरकुटे-म्हसवड व वाकी गावच्या हद्दीतून वाहणाऱ्या माणगंगा नदीपात्रात गेल्या काही दिवसांंपासून वाळू माफियांनी उच्छाद मांडला आहे. रात्रीच्या अंधारातून मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा केला जात आहे. मात्र, यावर महसूल विभागाकडून कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
म्हसवड ते शिंगणापूर रस्त्यावरच वरकुटे – म्हसवड गाव आहे. तर दोन किमी अंतरावर वाकी हे गाव आहे. या दोन्ही गावाजवळून माणगंगा नदी जाते. नदीवर वरकुटे – म्हसवड गावापासून काही अंतरावरच बंधारा बांधण्यात आला आहे. गेली कित्येक वर्षांपासून या भागातील काही वाळू माफियांनी या बंधाऱ्यापासून खाली चोरून वाळू काढण्याचा उद्योग सुरू केला आहे. हे वाळू माफिया रात्रीच्या अंधारात वाकी ते दिवड व शिंगणापूर रस्त्याने येऊन वरकुटे – म्हसवड गावच्या हद्दीत माणगंगा नदीपात्रात उतरून वाळू उपसा करत आहेत. त्यासाठी ट्रक, डंपर, ट्रॅक्टरचा वापर या वाळू माफियांकडून केला जात आहे. चाळून काढलेल्या वाळूचे नदीपात्रातच ढीग मारून ती लगेच ट्रॅक्टर व डंपरच्या साह्याने रात्रीच इच्छित स्थळी पाठविण्यात येत आहे. मात्र, महसूल विभागाकडून या वाळू माफियांवर कारवाई होत नाही.