ऑनलाईन टीम / मुंबई :
केंद्र सरकार आधारकार्ड प्रमाणेच आता युनिक हेल्थ कार्ड बनविण्याच्या तयारीत आहे. डिजीटल हेल्थ मिशनअंतर्गत बनविण्यात येणाऱया या कार्डवर आधारप्रमाणेच नंबर असणार आहे. ज्याद्वारे व्यक्तीच्या आरोग्याशी संबंधित माहिती साठविली जाईल. त्यामुळे संबंधिताला कोणतीही फाईल सोबत बाळगण्याची आवश्यकता राहणार नाही.
युनिक कार्डवर असणाऱया नंबरवर सरकार प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्याशी संबंधीत डेटाबेस तयार करेल. या आयडीसह त्या व्यक्तीचा मेडिकल रेकॉर्ड दाखल केला जाईल. त्यामुळे संबंधित व्यक्तीला रुग्णालयात जाताना कोणत्याही फाईल्स घेऊन जाव्या लागणार नाही. डॉक्टर किंवा रुग्णालय त्या रुग्णाचे युनिक हेल्थ कार्ड पाहून त्याचा संपूर्ण डेटा काढतील. त्याद्वारे रुग्णावर पुढील उपचार केले जातील. तसेच या कार्डद्वारे व्यक्तीला कोणत्या सरकारी योजनांचा लाभ मिळू शकतो, याचीही माहिती मिळेल.
युनिक हेल्थ कार्डची सुविधा पूर्णपणे ऑनलाईन असेल. लोकांना जागरूक करणे आणि त्यांना आरोग्य अभियानाशी जोडणे हा या योजनेचा उद्देश आहे.