ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने अमेरिकेत मागील दीड वर्षांपासून बंद असलेल्या शाळा पुन्हा सुरू करण्यात आल्या. मात्र, याचा मुलांना मोठा फटका बसला. ऑगस्ट अखेरीस अमेरिकेत अडीच लाखांहून अधिक मुलांना कोरोनाची लागण झाली. तर महिनाभरात 7.5 लाखांहून अधिक मुले कोरोना संक्रमित झाली आहेत. अमेरिकन अकादमी ऑफ पीडियाट्रिक्सने एका अहवालात ही माहिती दिली आहे.
कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेत मागील दीड वर्षांपासून शाळा, महाविद्यालये बंद होती. मात्र, देशातील दुसरी लाट ओसरत असल्याने अमेरिकेने शाळा, महाविद्यालये सुरू करण्यास परव्नानगी दिली. मात्र, महिनाभरातच 7.5 लाख लहान मुलांना कोरोनाची लागण झाल्याने अमेरिकेच्या हेल्थ एक्सपर्टने यावर चिंता व्यक्त केली आहे. लहान मुलांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याने लहान मुलांच्या हॉस्पिटलवर दबाव वाढला आहे. 5 ऑगस्ट ते 2 सप्टेंबरच्या काळात साडे सात लाख मुलांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर आतापर्यंत अमेरिकेत 50 लाखांहून अधिक मुलांना कोरोनाची लागण झाली असून, त्यामधील 444 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.