साधे हार 300 रु. तर कलाकृती केलेले 600 रु.
प्रतिनिधी /पणजी
गोमंतकीयांचा सर्वात मोठा सण असलेल्या एwन गणेशचतुर्थीच्या काळात फुलांचे भाव तिप्पटीने वाढल्यामुळे किरकोळ फूल विक्रेत्यांबरोबर गणेशभक्तांचेही धाबे दणाणलेले आहेत. घाऊक व्यापाऱयांनी फुलांचे दर तिप्पटीने वाढविल्यामुळे 100 रु. ने मिळणाऱया हाराची किंमत 300 ते 350 पर्यंत गेली आहे.
गणेशचतुर्थी काळात गोव्यात दरवर्षी घाऊक फूल विक्रेत्यांकडून लाखो रुपयांची उलाढाल होत असते. ही फुले शेजारी राज्याबरोबर गोव्यातील बागायतींमधून विक्रीस आणल्या जातात. गेल्यावर्षी कोरोनामुळे फुलांची विक्री झाली नाही. गणेशचतुर्थी साधेपणाने साजरी केल्यामुळे घाऊक फूल विक्रेत्यांना नुकसानी सहन करावी लागली होती. यंदा परिस्थिती सुधारल्यामुळे सर्व बाजार भरले आहेत. त्याचप्रमाणे फूले खरेदीसाठीही ग्राहकांनी प्रचंड गर्दी केली आहे मात्र घाऊक विक्रेत्यांनी गेल्यावर्षीची नुकसानी भरुन काढण्यासाठी की काय फुलांचा दर तिप्पटीने वाढविला आहे. काही दिवसांपूर्वी 100 रुपयांनी मिळणाऱया हाराची किंमत 300 ते 350 पर्यंत नेऊन ठेवली आहे. तर कलाकृती केलेल्या हारांच्या किंमती 500 ते 600 पर्यंत आहेत. यंदा गणेशचतुर्थी मोठय़ा धुमधडाक्यात साजरी करण्याचे ठरविलेल्या गोमंतकीयांच्या खिशाला महागाईमुळे बरीच कात्री लागली आहे.









