प्रतिनिधी/ सोलापूर
राज्यातील अपर पोलीस अधीक्षक, पोलीस उपायुक्त, पोलीस उपाधीक्षक दर्जाच्या धिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश गृह विभागाचे सहसचिव कैलास गायकवाड यांनी दिले आहेत. यामध्ये सोलापुरातील सात पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत.
ग्रामीण पोलीस दलातील अपर पोलीस अधीक्षक झेंडे यांची बदली रायगड येथे झाली आहे. त्यांच्या जागी लातूर येथील अपर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव हे येत आहेत. पोलीस प्रशिक्षण केंद्र केगाव येथील प्राचार्य संजय लाटकर यांची बदली बृहन्मुंबईच्या पोलीस उपायुक्तपदी झाली आहे. त्यांच्या जागी पुणे शहरातील पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे या येत आहेत. सोरेगाव येथील राज्य राखीव बलाचे समादेशक रामचंद्र केंडे यांची नानविज येथे पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्यपदी बदली झाली आहे.
केगाव पोलीस प्रशिक्षण केंद्रातील पोलीस उपाधीक्षक शीतल वंजारी झगडे यांची राज्य गुप्तवार्ता विभागात अप्पर पोलीस उपायुक्तपदी बदली झाली आहे. त्यांच्या जागी पुणे शहरातील सहायक पोलीस आयुक्त मच्छिंद्र चव्हाण हे येत आहेत. अक्कलकोट येथील उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष गायकवाड, अहमदनगर येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपाधीक्षक प्रांजली सोनवणे व खेड (पुणे) येथील पोलीस उपाधीक्षक अनिल कुमार लंभाते हे तीन अधिकारी सोलापूर शहरात सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून येत आहेत.
बार्शीचे उपविभागीय पोलिस अधिकारी अभिजित धाराशिवकर यांची आष्टी (बीड) येथे बदली झाली आहे. त्यांच्या जागी गोंदिया येथील उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकूल हे येत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस अधिकाऱ्यांच्या रखडलेल्या बदल्यांकडे सर्वांचेच लक्ष लागले होते









