निवृत्त न्यायाधीश मुकुंदकुम शर्मा अध्यक्षपदी, अंजली भागवत, अंजुम चोप्राचाही समितीत समावेश
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
तीनवेळचा पॅरालिम्पिक सुवर्णजेता भालाफेकपटू देवेंद्र झाझरिया, माजी क्रिकेटपटू वेंकटेश प्रसाद व माजी वर्ल्ड चॅम्पियन मुष्टियोद्धा एल. सरिता देवी यांचा यंदाच्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार निवड समितीत समावेश केला गेला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश मुकुंदकुम शर्मा यांच्याकडे या समितीचे अध्यक्षपद सोपवले गेले असून माजी नेमबाज अंजली भागवत, भारतीय महिला संघाची माजी कर्णधार अंजुम चोप्रा हे देखील या समितीचे सदस्य असतील. क्रीडा मंत्रालयाने एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली.
झाझरियाने अलीकडेच संपन्न झालेल्या टोकियो पॅरालिम्पिक्समध्ये रौप्य जिंकले होते. पॅरालिम्पिक्समध्ये 2004 व 2016 च्या आवृत्तीत तो सुवर्णपदकाचा मानकरी देखील ठरला आहे.
यंदा क्रीडा पुरस्कार निवडीसाठी सदर समितीची येत्या काही दिवसात बैठक होणार असून त्यात पुरस्कार विजेते निश्चित केले जातील. दरवर्षी दि. 29 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून त्यावेळी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केला जातो. मात्र, यंदा ऑलिम्पिक व पॅरालिम्पिक्समधील भारतीय खेळाडूंची कामगिरी लक्षात घेऊन निवड करता यावी, यासाठी केंद्राने पुरस्कार निवडीची प्रक्रिया लांबणीवर टाकली होती.
यंदा टोकियो ऑलिम्पिक व पॅरालिम्पिक्स अशा दोन्ही स्पर्धांमध्ये भारताने भव्यदिव्य कामगिरी साकारली. ऑलिम्पिकमध्ये सर्वोच्च 7 पदके जिंकण्याचा विक्रम केला गेला तर पॅरालिम्पिक्समध्येही 19 पदकांची लयलूट केली.
भालाफेकपटू नीरज चोप्रा ऑलिम्पिक्समध्ये सुवर्ण जिंकत सर्वात मोठा स्टार ठरला. भारतासाठी ऍथलेटिक्समधील हे पहिले ऑलिम्पिक सुवर्ण ठरले. शिवाय, 13 वर्षातील सर्वोच्च सांगता देखील ठरली.
राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारात खेलरत्न सर्वोच्च पुरस्कार आहे. अलीकडेच त्याचे राजीव गांधी खेलरत्नऐवजी ध्यान चंद खेलरत्न पुरस्कार असे नामकरण केले गेले आहे. त्यानंतर अर्जुन पुरस्कार हा सर्वोच्च पुरस्कार आहे. खेलरत्न पुरस्कार जेत्याला 25 लाख रुपयांचे तर अर्जुन पुरस्कार जेत्याला 15 लाख रुपयांचे इनाम प्रदान केले जाते.
प्रशिक्षणात अव्वल योगदान देणाऱया प्रशिक्षकांसाठी द्रोणाचार्य पुरस्कार दिला जातो. याशिवाय, आजीवन पुरस्कार, राष्ट्रीय खेलरत्न प्रोत्साहन पुरस्कार व मौलाना अबुल कलम आझाद चषक पुरस्कार (2021) प्रदान केले जातात. सदर समितीत हॉकी प्रशिक्षक बलदेव सिंग, भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे महासचिव संदीप प्रधान, वरिष्ठ पत्रकार विजय लोकापल्ली व विक्रांत गुप्ता यांचाही समावेश आहे.









