धरणातील अतिरिक्त पाणी सोडले जाणार गावकऱ्यांनी घाबरून जाऊ नये – तहसीलदार
दोडामार्ग / वार्ताहर:
संततधार कोसळणाऱ्या पावसाच्या व ऐन गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दोडामार्ग तालुक्यातील नदीकाठच्या गावांसमोर पुन्हा संकट उभे राहिले आहे. तिलारी धरणाचे काही दरवाजे उघडुन पाणी सोडण्यात येणार असून नदी काठच्या गावांनी सतर्क राहण्याचे आवाहन दोडामार्ग तहसीलदार अरुण खानोलकर यांनी केले आहे. संबधित गावांना सायरनद्वारे खबरदारीचा इशारा देण्यात येणार असून शेती बागायतीमध्ये काम करताना तसेच गुरेढोरे यांची शिवाय साकव, कॉजवे यांवरून प्रवास करणारे तसेच नदी – नाले याठिकाणी कपडे धुण्यासाठी जाणाऱ्या महिला वगैरे सर्वांनी खबरदारी घेण्याचे आवाहन तहसीलदार खानोलकर यांनी केले आहे. तिलारी धरण प्रशासनाने दिलेल्या माहितीच्या आधारे श्री. खानोलकर यांनी हे तातडीचे आवाहन केले आहे. तालुका प्रशासन पूर्णपणे सज्ज असून लोकांनी घाबरून जाऊ नये असेही श्री. खानोलकर यांनी स्पष्ट केले आहे.
Previous Articleजिल्हय़ात ब्रुसेलोसिस प्रतिबंधक लसीकरणाला प्रारंभ
Next Article बडेकोळमठात रथोत्सव मिरवणूक उत्साहात









