अचूक बातमी “तरुण भारत”ची, बुधवार, 8 सप्टेंबर. 2021, सकाळी 10.15
● सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पॉझिटिव्हीटी घसरली
● कोरोना रूग्णवाढीसह चाचण्यांची संख्याही आटोक्यात
● बुधवारी जिल्ह्यात 454 नवे रूग्ण
● डेंग्यू, चिकनगुनिया आटोक्यात ठेवण्यासाठी धावपळ
● गणेशोत्सवाचा उत्साह वाढला
● जिल्ह्यात आज 1 लाख 47 हजार जणांचे ‘महा’लसीकरण
सातारा / प्रतिनिधी :
राज्यातील कोरोना हॉटस्पॉट म्हणून पहिल्या दहामधे असणारा सातारा जिल्हा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात चांगलाच सावरला आहे. दैनंदिन कोरोना रूग्णवाढीच्या आकडेवारीचा आलेख कमालीचा घसरला आहे. एका बाजूला कोरोना रूग्णवाढ कमी झाल्याने उसंत मिळत असली तरी जिल्ह्यात डेंग्यू आणि चिकनगुनियाच्या साथीने डोके वर काढला आहे. वातावरणातील सातत्याने होणारा बदलामुळे जिल्ह्यात साथरोग वाढत आहे. दरम्यान बुधवारी जिल्ह्यात कोरोनाच्या 454 नव्या रूग्णांंची भर पडली आहे. या रूग्णवाढीने जिल्ह्यातील पॉझिटिव्हीटी रेट 3.54 वर पोहचला आहे.
गर्दी वाढली…पॉझिटिव्हीटीही कमी झाली
गणेशोत्सव चार दिवसांवर आला असून, शहरांमधील बाजारपेठात खरेदीसाठी आठवडाभरात गर्दी चांगलीच वाढली आहे. गर्दी वाढली असली तरी यात आठवडाभरात जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्हीटी रेट कमालीचा घसरला आहे. 1 सप्टेंबर रोजी एकूण चाचण्या 11 हजार 503 झाल्या तर पॉझिटिव्ह 579 आढळले होते. 2 सप्टेंबरला 560 रूग्णांची वाढ होऊन पॉझिटिव्हीटी रेट 5.49 होता. 3 सप्टेंबरला चाचण्यांची संख्या अचानक कमी झाली. या दिवशी 7647 चाचण्या झाल्या. त्यापैकी 351 रूग्ण पॉझिटिव्ह आढळलेे. पॉझिटिव्हीटी रेट 4.59 वर घसरला. 4 सप्टेंबर रोजी 549 रूग्ण वाढल्याने पुन्हा पॉझिटिव्हीटी रेट 5.24 वर पोहचला. 5 सप्टेंबर रोजी 10641 चाचण्या झाल्या त्यामधे केवळ 311 रूग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने पॉझिटिव्हीटी रेट 2.97 वर घसरला. 6 सप्टेंबरला पॉझिटिव्हीटी रेट 2.89 एवढा आणखी खाली आला. मात्र आज बुधवारी पॉझिटिव्हीटी रेट काहीसा वाढला असून 3.54 वर गेला.
जिल्ह्यात आज 1 लाख 47 हजार जणांचे महालसीकरण
जिल्ह्यात आज अखेर एकूण 13,90,057 लोकांना लसिकरणाचा प्रथम डोस देण्यात आला आहे. तर 5,65,338 लोकांना लसिकरणाचा दुसरा डोस देण्यात आला असून, एकूण 19,55,395 लोकांचे कोरोना लसीकरण पुर्ण झाले आहे. दरम्यान 6 सप्टेंबर 2021 रोजी सातारा जिल्हयास कोरोना लसीकरणाअंतर्गत कोविशिल्ड लसीचे एकूण 1 लाख 41हजार डोस व कोव्हाक्सीन चे 6 हजार 400 डोस असे एकूण 1 लाख 47 हजार डोस उपलब्ध झाले आहेत. त्या अनुषगांने 8 सप्टेबंर 2021 रोजी जिल्हयात कोरोनाचे महा लसिकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हयातील सर्व शासकिय रुग्णालय, उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुगणालय, उपजिल्हा रुग्णालय व जिल्हा सामान्य रुग्णालय या ठिकाणी मोफत लसिकरणाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हयातील शहरी विभाग सातारा, कराड, वाई, फलटण व कोरेगांव या ठिकाणी लसीकरणा करीता ऑनलाईन नोंदणी आवश्यक असल्याचे जिल्हापरिषदेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
डेंग्यू,चिकनगुनियाचे रूग्ण वाढताहेत
जिल्ह्यात कोरोना रूग्णवाढीचा पॉझिटिव्हीटी रेट कमी होत असल्याने गणेशोत्सवाचा उत्साह वाढताना दिसतोय. मात्र डेंग्यू आणि चिकनगुनियाचे रूग्ण वाढत असल्याने आरोग्य विभागाची चिंता पुन्हा वाढली आहे. सातारा शहरात चिकणगुन्या आणि डेंग्यूचे रूग्ण गेल्या 15 दिवसात वाढले असून जिल्ह्यात आत्तापर्यंत 344 डेंग्यूचे तर 74 चिकनगुनियाचे रूग्ण झाले आहेत. जिल्हा आरोग्य विभागाने कोरोना रूग्णवाढ होऊ नये म्हणून लसीकरण वाढवतानाच जिल्ह्यात डेंग्यू आणि चिकनगुनिया आटोक्यात यावा यासाठी कंबर कसली आहे. स्थानिक नगरपालिका,ग्रामपंचायतींना फॉंगिग करणे, डेंग्यूचे डास कशामुळे होतात याबाबत जनजागृती करण्याच्या सुचना नव्याने देण्यात आल्या आहेत.
मंगळवारपर्यंत जिल्हय़ात
एकूण नमुने 18,69,280
एकूण बाधित 2,43,117
एकूण कोरोनामुक्त 2,30,010
मृत्यू 6,047
उपचारार्थ रुग्ण 9963
मंगळवारी जिल्हय़ात
बाधित 454
मुक्त 1,093
मृत्यू 06









