टोकियो पॅरालिम्पिक्सची सांगता, भारताचे विक्रमी यश
वृत्तसंस्था/ टोकियो
पॅरालिम्पिक्सच्या अखेरच्या दिवशीही भारतीय खेळाडूंनी दोन पदके पटकावत स्पर्धेची यशस्वी सांगता केली. बॅडमिंटनमध्ये कृष्णा नागरने सुवर्ण तर सुहास यतिराजने रौप्यपदक पटकावले. भारताने या स्पर्धेत 5 सुवर्ण, 8 रौप्य व 6 कांस्य अशी एकूण 19 पदके पटकावत पदकतक्त्यात 24 वे स्थान मिळविले. चीनने 96 सुवर्णांसह एकूण 207 पदके मिळवित पहिले, ग्रेट ब्रिटनने 41 सुवर्णांसह 124 आणि अमेरिकेने 37 सुवर्णांसह एकूण 104 पदके मिळवित तिसरे स्थान पटकावले.
22 वर्षीय कृष्णा नागरने पुरुष एकेरी एसएच 6 क्लासच्या अंतिम लढतीत हाँगकाँगच्या चु मन काइचा 21-17, 16-21, 21-17 असा पराभव करीत अपराजित राहून खऱया अर्थाने अजिंक्यपद पटकावले. त्याचाच सहकारी प्रमोद भगतने याआधी बॅडमिंटनमध्ये सुवर्ण मिळविले आहे. भगतने एसएल 3 क्लासमध्ये शनिवारी भारताला बॅडमिंटनमधील पहिले सुवर्ण मिळवून दिले होते. ‘माझे स्वप्न अखेर साकार झाले. आई-वडील, काका-काकू, परमेश्वर व माझ्या प्रशिक्षकांचे मी मनापासून आभार मानतो,’ असे नागर जेतेपदानंतर म्हणाला. भारताचे हे या स्पर्धेतील पाचवे सुवर्ण आहे.

‘पॅरालिम्पिक्समध्ये बॅडमिंटनचा समावेश होण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यात भारताने चमकदार प्रदर्शन केले असून यापुढेही आपले खेळाडू असेच उज्ज्वल यश मिळवतील,’ असे रौप्यविजेता सुहास यतिराज म्हणाला. सुहासला एसएल 4 क्लासमध्ये अतिशय रंगतदार ठरलेल्या अंतिम लढतीत फ्रान्सच्या अग्रमानांकित लुकास मझूरकडून 21-15, 17-21, 15-21 असा पराभव स्वीकारावा लागल्याने रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. मझूर हा दोन वेळचा वर्ल्ड चॅम्पियनही आहे. मिश्र दुहेरीत मात्र भारताच्या प्रमोद भगत व पलक कोहली यांना एसएल 3-एसयू 5 क्लामधील कांस्यपदकाच्या लढतीत जपानच्या दायसुके फुजिहारा व अकिको सुगिनो या जोडीकडून 21-23, 19-21 असा पराभव स्वीकारावा लागल्याने त्यांचे कांस्यपदक हुकले. त्याआधी उपांत्य फेरीत त्यांना इंडोनेशियन जोडीकडून 3-21, 15-21 असा पराभव स्वीकारावा लागला होता.
वाढ खुंटल्याने अपेक्षित उंची नसलेल्या नागरला त्याच्या चुलत भावाने या खेळाकडे वळवले. मात्र चार वर्षापूर्वी त्याने या खेळाकडे गांभीर्याने लक्ष देण्यास सुरुवात केली. नंतर त्याने पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्य मिळविले आणि 2019 मधील वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये त्याने एकेरी व दुहेरीत अनुक्रमे कांस्य व रौप्यपदक पटकावले. जागतिक क्रमवारीत दुसऱया स्थानावर असणाऱया नागरने ब्राझीलमध्ये रौप्य आणि गेल्या वर्षी पेरूमध्ये एकेरी व दुहेरीत अशी दोन सुवर्णपदकेही पटकावली आहेत. यावर्षी एप्रिलमध्ये दुबईत झालेल्या पॅरा बॅडमिंटन आंतरराष्ट्रीय स्पर्धेतही त्याने दोन सुवर्णपदके पटकावली आहेत.
जिल्हा दंडाधिकारी असलेला सुहास यतिराज हा पॅरालिम्पिक्समध्ये पदक जिंकणारा पहिला आयएएस अधिकारी बनला आहे. ‘पदक जिंकल्याचा आनंद आहे, पण दुसऱया गेममध्येच मी सामना संपवायला हवा होता. या गेममध्ये मी 17-13 असा आघाडीवर होतो, त्यामुळे मी थोडा निराशही झालो आहे. पण जो सरस खेळतो, तोच विजयी होतो, लुकासचे मनापासून अभिनंदन,’ असे सुहास नंतर म्हणाला. एसएल 4 क्लासमध्ये खेळाडूंच्या अवयवात दोष असतो, त्यांना उभ्यानेच खेळावे लागते. कांस्यपदकाच्या लढतीत द्वितीय मानांकित तरुण धिल्लाँलाही इंडोनेशियाच्या प्रेडी सेतियावनकडून 17-21, 11-21 असा पराभव स्वीकारावा लागल्याने त्याचेही पदक हुकले.
भारतीय नेमबाज अवनी लेखरा व अन्य दोघांना मिश्र 50 मी. रायफल प्रोन एसएच 1 या प्रकारात अंतिम फेरीसाठी पात्र ठरता आले नाही. लेखराने पात्रता फेरीत 28 स्थान मिळविले तर सिद्धार्थ बाबूला 9 वे स्थान मिळाले. त्याची पात्रता फक्त 0.2 गुणांनी हुकली. त्याने 617.2 गुण मिळविले तर लेखराने 612 गुण मिळविले. नेमबाजीत भारताने एकूण 5 पदके पटकावत आजवरची सर्वात यशस्वी कामगिरी केली.
रविवारी झालेल्या समारोप समारंभारताने अवनी लेखराज भारताची ध्वजधारक होती. तिने येथे दोन (सुवर्ण व कांस्य) पदके पटकावली आहेत.









