वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
नुकत्याच झालेल्या टोकियो पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय स्पर्धकांनी भरघोस यश प्राप्त केल्याने भारतीय क्रीडा क्षेत्रामध्ये या स्पर्धेला खास वेगळे स्थान प्राप्त झाले असून देशातील युवा पिढीला त्याने प्रोत्साहन मिळत असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
या स्पर्धेत पदक मिळविणाऱया भारताच्या सर्व खेळाडूंचे पंतप्रधान मोदी यांनी खास कौतुक केले आहे. या स्पर्धेमध्ये भारताचे 54 जणांचे पथक 9 क्रीडाप्रकारात सहभागी झाले होते. भारताने या स्पर्धेत पाच सुवर्ण, 8 रौप्य आणि 6 कांस्य अशी एकूण 19 विक्रमी पदकांची कमाई केली आहे. टोकियो पॅराऑलिम्पिक स्पर्धेत प्रथमच बॅडमिंटन आणि तायक्वांदो या क्रीडा प्रकारात भारताचे स्पर्धक भाग घेतले होते. पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेच्या इतिहासामध्ये भारताने मिळविलेले हे सर्वोच्च यश देशातील प्रत्येक नागरिकाला अभिमानास्पद ठरणारे असून युवा पिढीला क्रीडा क्षेत्राकडे वळण्याचे प्रोत्साहन या घटनेने मिळाले आहे, असेही त्यांनी प्रतिपादन केले.









